बीडमध्ये बदल्यांमध्ये पती- पत्नीसह महिला शिक्षिकांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:58 PM2018-05-30T23:58:51+5:302018-05-30T23:58:51+5:30
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत शिक्षक व पती- पत्नी तसेच महिला शिक्षिकांवर अन्याय झाला असून बदली प्रक्रियेतील अयिमितता दूर करावी नसता न्यायालयात दाद मागण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तालुक्यातील २०० विस्थापित शिक्षकांनी केली. यात १६० महिला शिक्षिकांचा समावेश आहे.
बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत शिक्षक व पती- पत्नी तसेच महिला शिक्षिकांवर अन्याय झाला असून बदली प्रक्रियेतील अयिमितता दूर करावी नसता न्यायालयात दाद मागण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तालुक्यातील २०० विस्थापित शिक्षकांनी केली. यात १६० महिला शिक्षिकांचा समावेश आहे.
संवर्ग १ व २ मधील शिक्षकांनी खो दिलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे आमचे पसंतीक्रम बाद झाले असे या विस्थापित शिक्षकांचे मत आहे. बदली प्रक्रिया सेवा ज्येष्ठतेनुसार होणे अपेक्षित असताना सेवेने कनिष्ठ शिक्षकांना वरिष्ठ शिक्षकांनी मागितलेल्या जागा देण्यात आल्या. संवर्ग १ मध्ये लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र व व्यक्तींची तपासणी बदली आदेश देण्यापूर्वी होणे गरजेचे होते. ते झाले नाही त्यामुळे अनेक बोगस लाभार्थ्यांनी या संवर्गाचा लाभ घेतल्याची तक्रार सीईओंना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पती- पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेऱ्यासाठी संवर्ग ४ मधून बदली अर्ज भरलेल्या पती- पत्नीचा या बदली प्रक्रियेत विचार झाला नाही. त्यामुळे अनेक पती- पत्नी एकटेच विस्थापित झाले. विशेष म्हणजे यात महिला शिक्षिका जास्त प्रमाणात विस्थापित झाल्या. संवर्ग ४ मधील व संवर्ग २ मधील कर्मचाºयांना वेगवेगळा न्याय बदली प्रक्रियेत दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या कर्मचाºयांना अर्ज भरण्यासाठी रिक्त पदाची यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी वरिष्ठांना कळविले जाईल असे सीईओ अमोल येडगे म्हणाले.
७ विभागात ३८ बदल्या
बीड जिल्हा परिषदेत बुधवारी शिक्षण, पशुसंवर्धन, आरोग्य, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी विभागातील ३८ बदल्या झाल्या. सीईओ अमोल येडगे, अतिरिक्त सीईओ धनराज नीला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, डीएचओ राधाकृष्ण पवार व खातेप्रमुखांच्या उपस्थितीत या बदल्या पार पडल्या. शिक्षण व आरोग्य संवर्गाच्या बदल्यांच्या वेळी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख उपस्थित होते.