आरोग्य विभागाच्या अपुऱ्या मनुष्यबळाचा कोरोनाबाधितांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:39+5:302021-03-20T04:32:39+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही आरोग्य विभागाकडून मनुष्यबळ वाढविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिचारिका नसल्याने वेळेवर उपचार ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही आरोग्य विभागाकडून मनुष्यबळ वाढविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिचारिका नसल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत तर वाॅर्डबॉय नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णांच्या तक्रारी वाढल्यानंतरही आरोग्य विभाग गप्प असल्याने संताप व्यक्त होत आहे. मनुष्यबळ वाढवून उपचार आणि सुविधांमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्हा रुग्णालयातील तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. दोन दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आरोग्य विभागाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांना कक्षात बोलावून घेत सुनावले होते. त्यानंतर तरी यात सुधारणा होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, वाढती रुग्णसंख्या पाहता काहीच उपाययोजना केल्या नसल्याचे दिसत आहे. बाधित रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत, त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. वेळेवर स्वच्छताही होत नसल्याचे समोर आले आहे. या तक्रारी कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने तात्काळ मनुष्यबळ वाढवावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
५६ परिचारिकांवर जिल्हा रुग्णालय
जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित व बाधित असे जवळपास २५० पेक्षा जास्त रुग्ण दाखल आहेत. परंतु, त्यांची शुश्रूषा करण्यासाठी केवळ ५६ परिचारिका आहेत. त्यातच लिपिकाची कामे अधिक असल्याने त्यांना उपचाराकडे लक्ष देताना अडचणी येत आहेत. नियमानुसार ३ रुग्णांमागे एक परिचारिका असणे गरजेचे आहे. परंतु, येथे ३० रुग्णांचा भार एका परिचारिकेवर असल्याचे दिसते.
इन्चार्ज परिचारिका ढकलतात स्ट्रेचर
जिल्हा रुग्णालयात वॉर्डबाॅयची कमतरता असल्याने मेडिसीन आणणे, नेणे, नातेवाईकांना बाहेर काढणे, स्वच्छता आदी कामे इन्चार्ज परिचारिका आणि परिचारिकांना करावी लागत आहेत. विशेष म्हणजे, अनेकदा त्यांच्यावर स्ट्रेचर ढकलण्याचीही वेळ येते. अगोदरच कामाचा ताण असताना वरिष्ठांकडून त्यांच्यावर कामाचा दबाव आणला जात आहे. त्यांना कारवायाच्या धमक्या दिल्या जात आहेत. डॉक्टरांकडून वेळेवर राऊंड घेतला जात नाही. असे असतानाही त्यांना पाठीशी घातले जाते. केवळ परिचारिकांना टार्गेट करण्याचा प्रकार वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. दुजाभाव केला जात असल्याने परिचारिकाही वैतागल्या असल्याचे अनेक इन्चार्ज परिचारिकांनी बोलून दाखविले.
सीसीसीमध्ये तर परिचारिकाच नाहीत
बीड शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता चार ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सीसीसीमध्ये एकही परिचारिका नसल्याचे सांगण्यात आले. तसेच आयटीआय, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालय येथेही बोटावर मोजण्याइतकेच मनुष्यबळ आहे. त्यामुळे येथील तक्रारी कमी होत नाहीत.
कोट
एकूण रुग्णांच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे, हे खरे आहे. परंतु नव्याने भरती करणे सुरूच आहे. तीन रुग्णांमागे एक परिचारिका नाही, वॉर्डबॉय पण नाहीत. पण ही सर्व पदे भरण्याबाबत कारवाई सुरू आहे.
डॉ.सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड