इनामी जमीनप्रकरणी होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:12+5:302021-06-09T04:41:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील देवस्थानांच्या इनामी जमिनी अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून काही जणांनी नावावर करून घेतल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील देवस्थानांच्या इनामी जमिनी अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून काही जणांनी नावावर करून घेतल्या आहेत. याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार चौकशी करण्याचे आदेश आयुक्त कार्यालयातून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील देवस्थानच्या इनामी तसेच वक्फच्या जवळपास २७ हजार एकर शेतजमिनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जणांनी नावावर करून घेतल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील नामलगाव येथील गणपती मंदिराची इनामी शेतजमीन जुन्या अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन नावावर केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा फेर रद्द करण्यात आला. त्यानंतर इतर सर्व इनामी शेतजमिनींचे फेर रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणांतील अधिकारी व खासगी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल उपायुक्त पराग सोमन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील काळात चौकशीनंतर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
....
राजकीय पुढाऱ्यांचा हात ?
देवस्थानच्या व इतर इनामी शेतजमिनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून नावावर करून घेणाऱ्यांमध्ये बहुतांश सर्वपक्षीय नेत्यांचा हात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. तसेच चौकशी योग्य पद्धतीने झाली तर, पुढील काळात याप्रकरणांतील सर्व चेहरे समोर येतील, अशी आशादेखील त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.