ही घटना मानवतेला काळीमा फासणारी, राज्य सरकारने तातडीनं कठोर कारवाई करावी
By महेश गलांडे | Published: November 15, 2020 04:45 PM2020-11-15T16:45:27+5:302020-11-15T16:46:18+5:30
ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे
बीड - जिल्ह्यातील येळंब घाट परिसरात प्रेयसीवर अॅसिड टाकून आणि पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. जखमी अवस्थेत पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. तसेच, याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22) असं मृत तरुणीचं नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे नावाच्या तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा-केज या मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर तरुणाने रस्त्याच्या बाजूला अगोदर तरुणीवर अॅसिड टाकले, काही वेळाने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. त्यानंतर, आरोपी तरुण घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेत सावित्रा 48 टक्के भाजली होती.
ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात ट्विट केलं आहे. ''एका तरुणीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, १२ तास ती रस्त्यावर तशीच पडून होती आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी.'', अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
उपचारादरम्यान मृत्यू
दुर्दैवी म्हणजे, पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात दुपारी 2 वाजेपर्यंत तडफडत होती. काही वेळानंतर रस्त्यावर वरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला आणि जखमी तरुणीला स्वत : च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून रुग्णवाहिकेनं बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. पण, अॅसिड हल्ला आणि पेट्रोलने 48 टक्के शरीर भाजल्यामुळे तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.