अनाकलनीय ! वानरांकडून महिनाभरात २५० कुत्र्यांच्या पिलांची हत्या, उंचावर घेऊन जात देत आहेत फेकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 05:10 PM2021-12-15T17:10:43+5:302021-12-15T17:20:13+5:30
Monkey kills Puppies : उंच इमारत किंवा झाडा घेऊन जात पिलांना खाली फेकून देत आहेत वानरे
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील लवुळ येथे मागील एक महिन्यापासून वानरांनी धुमाकूळ घातला आहे. गावात कुत्र्याचे पिल्लू दिसले की वानर त्यास उचलून घेऊन जात उंच ठिकाणावरुन खाली फेकून देत त्यांचा जीव घेत आहेत (Monkey kills Puppies by unknown reason ) . या वानरांनी आतापर्यंत 200-250 कुत्र्यांच्या पिलांचा बळी घेतला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या अनाकलनीय घटनेकडे मात्र वन विभागाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
माजलगाव शहरापासून 10 कि.मी. अंतरावर लवुळ हे गाव आहे. या ठिकाणची लोकसंख्या पाच हजाराच्या घरात आहे. या ठिकाणी मागील दीड ते दोन महिन्यापासून तिन वानरांचा वावर आहे. हे वानरं मागील एक महिन्यापासून गावात असलेले कुत्र्यांची पिल्लं उचलून घेऊन जात आहेत. त्यानंतर पिलांना घेऊन उंच झाडावर किंवा घरावर जात तेथून फेकून देत आहेत. उंचावरून पडल्याने पिलांचा लागलीच मृत्यू होत आहे. आतापर्यंत या वानरांनी 200-250 पेक्षा जास्त कुत्र्यांचा पिलाचा बळी घेतला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
याच गावातील सिताराम नायबळ यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला 15 दिवसापूर्वी वानर घेऊन गेले होते. हे पिल्लू ओरडत असल्याने सिताराम नायबळ हे गच्चीवर जाऊन पिलाला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना वानर त्यांच्या अंगावर धावून आले असता सीताराम नायबळ हे पळत असताना गच्ची वरून खाली पडले त्यात त्यांचा पाय मोडला. त्यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
याबाबत येथील ग्रामपंचायतीने धारूर येथील वनविभागाच्या धिकार्यांशी संपर्क केला असता ते केवळ एक दिवस आले व थोडावेळ त्या वानरास पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते वानर पकडता न आल्याने ते निघून गेले. त्यानंतर ते इकडे फिरकले देखील नाही. यामुळे लवुळकरांचा वनविभागाच्या अधिका-यांच्या विरोधात रोष निर्माण होतांना दिसत आहे.