नियंत्रण कक्षातच असुविधा, अडचणी कशा सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:32 AM2021-04-21T04:32:58+5:302021-04-21T04:32:58+5:30
धारूर : येथील तहसील कार्यालयात कोरोनासंदर्भातील अडीअडचणी सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अस्वच्छता, पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती ...
धारूर : येथील तहसील कार्यालयात कोरोनासंदर्भातील अडीअडचणी सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अस्वच्छता, पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती आणि बंद फोनमुळे हा नियंत्रण कक्ष फक्त नावालाच उभारला काय? असा प्रश्न लोक विचारत आहेत.
कोरोनाबाबतीत नागरिक व कर्मचाऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन केला. परंतु धारूरच्या नियंत्रण कक्षात कर्मचारी नियुक्त केला, मात्र, तेथील फोन बंद अवस्थेत आहे. कधीतरी संपर्क होतो, तर आवाज येत नाही? त्यामुळे संवाद तुटतो. अनेकदा तर फोनच लागत नाही. नियंत्रण कक्ष अस्वच्छ जागी करण्यात आला आहे. ड्युटीसाठी येणाऱ्या शिक्षकांना कसल्याही प्रकारची सॅनिटायझरची व्यवस्था केलेली दिसत नाही? बसण्यासाठी मोडक्या खुर्च्या आहेत. त्यामुळे या कक्षात नियंत्रणासाठी नेमलेल्या कर्मचारी, शिक्षकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शिक्षक कर्तव्य बजावत आहेत. त्यांनाही कुटुंब आहे. मग, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनाची नाही? काय? सॅनिटायझर, तोंड, हात धुण्यासाठी साबण, पाण्याची व्यवस्थादेखील प्रशासनाने करणे गरजेचे होते. परंतु या ठिकाणी असे काहीही दिसत नाही? यातच भर तहसील परिसर अंधारात असतो. कोरोना बाबतीत अधिकाऱ्यांना काही भान आहे की नाही? असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे. ब्रेक द चेनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथे सुविधा उपलब्ध करण्याची गरज असल्याचे दिसून आले.
नियंत्रण कक्षात सुविधा द्या
मी काल दोन तीन वेळा तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षात फोन लावला तर तो लागला नाही? नॉट रिचेबल येत होता. माहिती मिळण्यास विलंब झाला तर रूग्ण व नातेवाईकांपुढे अडचणी येतात. नियंत्रण कक्ष आता गरजेचे आहे. तेथे आवश्यक सुविधा व फोन दुरुस्त करावा. - सतीश पोतदार, नागरिक
नियंत्रण कक्ष सक्षम करणार
कोविड नियंत्रण कक्षातील फोनमध्ये आवाज येत नाही. ते दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्याला सांगितले आहे. लवकरच दुरुस्ती होईल. आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून तसेच वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करून नियंत्रण कक्ष सक्षम केला जाईल. - प्रकाश गोपड, नायब तहसीलदार.
===Photopath===
200421\20bed_3_20042021_14.jpg~200421\20bed_2_20042021_14.jpg~200421\20bed_1_20042021_14.jpg