स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात असुविधा; खाटांअभावी गर्भवतींचा चटईवरच मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:21+5:302021-02-27T04:45:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील आयपीडी व ओपीडी विभाग कोरोनामुळे आदित्य वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील आयपीडी व ओपीडी विभाग कोरोनामुळे आदित्य वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहेत. परंतु, येथे अपुऱ्या जागेअभावी गर्भवती महिलांचे हाल होत आहेत. येथील प्रसूती विभागाचे काम चांगले असले तरी येथे सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील डागडुजी व उपाययोजनांसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करूनही सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
प्रसूती विभागातील परिचारिका, डॉक्टरांचे काम समाधानकारक आहे. परंतु, प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना आरामासाठी बेड नाहीत. त्यामुळे त्यांना चटई टाकून मुक्काम करावा लागतो. तसेच शौचालय, शुद्ध पाणी व इतर मुबलक सुविधा देण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. हे सर्व प्रकार असतानाही जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक दुर्लक्ष करीत आहेत.
सीएस, एसीएसचे ढिसाळ नियोजन
प्रसूती विभागात आलेल्या महिलांना बेड, गादी, बेडसीट, पाणी, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते. परंतु जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांच्या गलथान कारभारामुळे येथे कसलेच नियोजन नाही. जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर हे अधिकारी परिचारिका, डॉक्टरांना दोषी धरून हात वर करतात. भंडारा येथील दुर्घटनेत असाच प्रकार झाल्याने परिचारिकाही सावध झाल्या आहेत.
डॉक्टरांचा वेळेवर राउण्ड होईना?
प्रसूती विभागात संबंधित डॉक्टरांनी वेळेवर येऊन राउण्ड घेणे आवश्यक असते. परंतु, बोटावर माेजण्याइतकेच डॉक्टर प्रामाणिक कर्तव्य बजावतात. काही डॉक्टर आपले खासगी रुग्णालयात रुग्ण तपासून नंतर सरकारी रुग्णालयातील रुग्णांना तपासणीसाठी येतात. त्यामुळे वेळेवर राउण्ड होत नाही.
राउण्डचा आढावा एसीएसने घेणे अपेक्षित असते. परंतु, त्यांचे ढिसाळ सामान्य रुग्णांसाठी त्रासदायक ठरत असतानाही त्यांना वरिष्ठ पाठीशी घालतात, हे विशेष.
येथे आल्यावर परिचारिका, डॉक्टरकडून चांगले उपचार मिळाले. परंतु, येथे पाणी, स्वच्छता आदी सुविधा नाहीत. दाखल झाल्यावर ते प्रसूती होईपर्यंत खूप हाल झाले. एका डॉक्टरला बोललेदेखील; पण उपयोग नाही झाला. सुधारणा करण्याची गरज आहे.
मनीषा काळे, नातेवाईक
ज्यांचा फोन येतो, त्यांना येथे चांगल्या सुविधा मिळतात. आमच्यासारख्याला कोणाचे आशीर्वाद नसल्याने आहे त्या असुविधांमध्ये राहून उपचार घ्यावे लागले. हा प्रसूती विभाग म्हणजे जनावरांच्या गोठ्यापेक्षा खराब आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हाल थांबवावेत.
दगडाबाई माने, नातेवाईक