बीड जिल्ह्यात हरभऱ्याच्या तुलनेत ज्वारीच्या क्षेत्रामध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 01:11 PM2020-01-04T13:11:07+5:302020-01-04T13:32:14+5:30
मागील दोन वर्षांच्या तुलनेत ज्वारीचे क्षेत्र कमालीचे आणि हरभऱ्यापेक्षा जास्त वाढले आहे.
बीड : यंदा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात रबीच्या ८१ टक्के पेरण्या झाल्या असून सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे आहे. त्यापाठोपाठ हरभरा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल राहिला. मागील दोन वर्षांच्या तुलनेत ज्वारीचे क्षेत्र कमालीचे आणि हरभऱ्यापेक्षा जास्त वाढले आहे.
मागील वर्षी पाऊस प्रमाण अत्यल्प राहिल्याने रबी हंगाम धोक्यात आला होता. यंदा मात्र तो जोमात आला आहे. जिल्ह्यात रबीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्टर इतके आहे. यापैकी ३ लाख ४० हजार ६४९ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने परंतू पुढील वातावरण पोषक राहिल्याने रबी हंगामात शेतकऱ्यांनी कस लावला आहे. ज्वारीच्या २ लाख ५६ हजार २१० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ६३ १ लाख ७५ हजार ११७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार २९० आहे. १ लाख ३१ हजार ८७६ हेक्टरात हरभऱ्याचा पेरा झाला आहे. मक्याचे क्षेत्र १२ हजार ९३२ असून २५१७ हेक्टरवर पेरा झाला आहे. तर गव्हाचे क्षेत्र ४७ हजार ९८० हेक्टर असून ३० हजार ३६९ हेक्टरात पेरा झाला आहे.
एकमेव बीड तालुक्यात ३० हेक्टरात इतर तृणधान्याचे पीक घेण्यात आले आहे. बीड तालुक्यात २१ आणि अंबाजोगाई तालुक्यात १९० अशा २९० हेक्टर क्षेत्रात इतर कडधान्याचा पेरा झाला आहे. पाटोदा ६५, आष्टीत २७, अंबाजोगाईत १८०, केज तालुक्यात ९२ अशा एकूण ३६४ हेक्टर क्षेत्रात करडईचा पेरा झाला आहे. बीड तालुक्यात ३, पाटोद्यात ८०, अंबाजोगाईत २४ असे एकूण १०७ हेक्टरात जवसाचा पेरा झाला आहे. बीड तालुक्यात ३७, पाटोद्यात ६ आणि अंबाजोगाईत १५ एकूण ५८ हेक्टरात इतर गळितधान्याचा पेरा झाला आहे.
किडीवर पहिला डोज लिंबोळी अर्क वापरा
सध्या काही ठिकाणी हरभऱ्यावर घाटेअळीचा तर मका, ज्वारीच्या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. अशा ठिंकाणी महागडी औषधे वापरण्यापेक्षा पहिला डोज म्हणून लिंबोळी अर्क वापरावे. त्याचबरोबर आवश्यक वेळी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.
खरिपातील नुकसान भरुन निघेल
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक अडचणी होत्या. मात्र या पावसामुळे रबीला आधार झाला. खरिपातील नुकसान भरुन काढण्यासाठी उपलब्ध क्षेत्रात रबीच्या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले.
धान्य व चाराही होईल
यावर्षी ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे धान्यासह पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल. अशीच पीक पध्दती राहिली तर चाऱ्याचे भाव कमी राहतील. त्यामुळे पशुधन सांभाळणे सुलभ होऊ शकेल. दोन्ही हंगामात किमान १० टक्के क्षेत्र हे चारा आणि धान्य पिकासाठी शेतकऱ्यांनी ठेवले पाहिजे.
- दिलीप जाधव, कृषी अधिकारी, बीड तालुका