कृष्णाच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:45 PM2018-12-28T23:45:02+5:302018-12-28T23:45:28+5:30
सुमित वाघमारे खून प्रकरणात मुख्य आरोपींना सहकार्य कराणाऱ्या कृष्णा रवींद्र क्षीरसागर याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलीस कोठडी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सुमित वाघमारे खून प्रकरणात मुख्य आरोपींना सहकार्य कराणाऱ्या कृष्णा रवींद्र क्षीरसागर याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलीस कोठडी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. तसेच त्याची जीपही जप्त केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्यार, वाहने व इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.
१९ डिसेंबरला सुमित वाघमारे या युवकाचा बालाजी लांडगे व संकेत वाघ यांनी प्रेमप्रकरणातून खून केला होता. त्यांना कृष्णा व गजानन क्षीरसागर यांनी सहकार्य केले होते. या सर्वांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. कृष्णाला अगोदरच अटक केली होती. तो पाच दिवस पोलीस कोठडीत होता. शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता ३१ डिसेंबरपर्यंत त्याला आणखी कोठडी मिळाली आहे. तसेच त्याची जीपही पोलिसांनी जप्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, आतापर्यंत गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच इतर महत्त्वाचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. यामध्ये बालाजी, संकेत आणि गजानन हे सुद्धा सध्या पोलीस कोठडीतच आहेत. यांची चौकशी केल्यावर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
त्या दोघांचे काय झाले
बालाजी, संकेत, कृष्णा आणि गजानन यांना फरार होण्यात एका महिलेसह पुरूषाने सहकार्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे.
याबाबत त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेत आणून चौकशीही करण्यात आली होती.
मात्र, त्यापुढे काय झाले? याची माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत.
सुरूवातीला त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार, असे पोलिसांनी सांगितले होते.
मात्र, आता हेच पोलीस यावर बोलण्यास तयार नसल्याने संशय व्यक्त होत आहे.