स्पर्धा परीक्षेतून परळीचा नावलौकिक वाढवा - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:16 AM2018-01-08T01:16:27+5:302018-01-08T01:16:35+5:30
तरूणाईमध्ये खूप मोठी ताकत आहे, हे ओळखून आजच्या तरूणांनी आत्मविश्वासाने स्पर्धा परिक्षांना सामोरे जाऊन परळी शहराचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : तरूणाईमध्ये खूप मोठी ताकत आहे, हे ओळखून आजच्या तरूणांनी आत्मविश्वासाने स्पर्धा परिक्षांना सामोरे जाऊन परळी शहराचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीतून बांधलेल्या खुले व बंदिस्त क्रीडा संकुल, मुलींच्या वसतीगृहाची नवीन इमारत तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय वक्ते प्रा. आनंद मुन्शी, नांदेडचे प्रा. विष्णू घुगे, जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जुगलिकशोर लोहिया, उपाध्यक्ष फुलचंद कराड, डॉ. दे. घ. मुंडे, सचिव दत्ताप्पा इटके, सुरेश अग्रवाल, कैलास घुगे, डॉ. हरिश्चंद्र वंगे, डॉ. शालिनी कराड, शांतीलाल जैन, प्राचार्य आर. के. इप्पर तसेच संस्थेचे सर्व संचालक, उपस्थित होते.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, साहेबांच्या नावाने सुरू केलेल्या अकॅडमीतील विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश आणि कॉलेजची दशा व दिशा बदलल्याचे पाहून आनंद झाला. येथील शैक्षणिक वातावरण चांगले व्हावे हेच मुंडे साहेबांचे स्वप्न होते. परळी व बीड जिल्हयाची मान उंच व्हावी यासाठी मी सध्या काम करत आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आनंदी तर रहाच पण सहनशीलताही ठेवा असे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. मधु जामकर, प्रा. पी. एल. कराड, प्रा. राठोड, प्रा. माधव रोडे, प्रा. गायकवाड, प्रा. जी. एस. चव्हाण, प्रा. वैरागडे, प्रा. सुर्यवंशी, प्रा. संतोष श्रीवास्तव यांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन प्रा. नयनकुमार विशारद यांनी केले तर प्रा. जगतकर यांनीआभार मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.
६४ विद्यार्थी संरक्षण सेवेत
वैद्यनाथ महाविद्यालयातील ६४ विद्यार्थी खडतर मेहनतीने संरक्षण सेवेत गेले आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परिक्षांमध्ये काही विद्यार्थ्यांनी लाखाची शिष्यवृत्ती मिळवली आहे, हे विद्यार्थी शहरातील विविध शाळामधील आहेत, ही निश्चितच भूषणावह बाब आहे, शहराचे शैक्षणिक वातावरण आता बदलत आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांच्या हस्ते संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला.
व्याख्यानाने नवचैतन्य
अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय किर्तीचे वक्ते प्रा. आनंद मुन्शी यांनी यावेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे उपस्थित पाच हजार विद्यार्थी - विद्यार्थिनींमध्ये नवचैतन्य संचारले.
यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, धाडस, कठोर मेहनत, आत्मविश्वास आदी गुण आत्मसात करावे, स्वत:ला खोटे बोलून फसवू नका, मोबाईल आणि इंटरनेटचा वापर टाळा असे आवाहन त्यांनी केले.