नेटकॅफे सेंटरची वेळ वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:07+5:302021-07-20T04:23:07+5:30
अंबाजोगाई : कोरोनामुळे सर्व दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत आहे. मात्र, ग्रामीण भागात नेट उपलब्ध राहत ...
अंबाजोगाई : कोरोनामुळे सर्व दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत आहे. मात्र, ग्रामीण भागात नेट उपलब्ध राहत नसल्याने नेटसंदर्भातील कामे करण्यास अडचण येते. त्यामुळे नेट कॅफेची वेळ वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पीक विमा योजना, विविध नोकर भरतीसंदर्भातील अर्ज भरण्यास नेटअभावी अडचण येते. यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक कचरे यांनी केली आहे.
----------------------------
शेतकऱ्यांना सुरक्षा किट पुरवावी
अंबाजोगाई : शेतकरी खरीप हंगामातील शेतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान, साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बचाव करण्यासाठी सुरक्षा किट पुरविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे गुडघ्यापर्यंतचे बूट, हॅँडग्लोज आदी साहित्यांचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, आता अशा योजना राबविण्यात येत नाहीत. शेतात सर्पदंश झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.
----------------------------
मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्यावे
अंबाजोगाई : स्वतःचे रक्षण करता यावे यासाठी मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस एकट्या मुलींना हेरून त्यांची छेडछाड करण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. मुलींना कराटे आल्यास त्या आपले रक्षण स्वतःच करू शकतात. त्यामुळे मुलींना कराटेचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
-----------------------------
प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा
अंबाजोगाई : अनेकांनी आपल्या दुचाकी वाहनावर मोठे आवाज करणारे सायलेंसर लावले आहेत. गर्दीचे ठिकाण हेरून वाहनचालक मोठ्या प्रमाणात आवाज करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. ही बाब टाळण्यासाठी अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
-------------------------------
हात धुण्याचे यंत्र बासनात
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने हात धुण्याचे यंत्र चौका-चौकात बसविण्यात आले होते. मात्र, त्या यंत्राची नासधूस झाली आहे. बहुतेक ठिकाणी तर पाणीच नसल्याचे दिसून येते, तर काही ठिकाणी महिनाभरापासून पाणीच बदलण्यात आले नाही. याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचे दुर्लक्ष हाेत आहे.
--------------------------------
मूर्तिकारांमध्ये पसरले नैराश्य
अंबाजोगाई : गणेशचतुर्थी तोंडावर आली आहे. मात्र, कोरोनाने यंदाही उत्सव साजरा करता येणार की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये नैराश्य पसरले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सार्वजनिक सण, उत्सव साजरे करण्यावर बंदी आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करता येणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.