अंबाजोगाईत वाढती बेफिकिरी कोरोनाला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:10+5:302021-03-26T04:33:10+5:30

अंबाजोगाई : तालुक्यात नागरिकांच्या वाढत्या बेफिकिरीमुळे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास प्रशासकीय यंत्रणा ...

Increased apathy in Ambajogai causes corona | अंबाजोगाईत वाढती बेफिकिरी कोरोनाला कारणीभूत

अंबाजोगाईत वाढती बेफिकिरी कोरोनाला कारणीभूत

Next

अंबाजोगाई : तालुक्यात नागरिकांच्या वाढत्या बेफिकिरीमुळे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरू लागल्याने सर्वच ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. नागरी रुग्णालयातच होणारी मोठी गर्दी संसर्गासाठी घातक ठरणारी आहे.

प्रशासनाकडून तपासण्या करून घेण्यासाठी दंडक सुरू आहे. मात्र, ॲण्टिजेन तपासणीसाठी किट उपलब्ध नसल्याने अनेकांना हेलपाटे होऊ लागले आहेत. ॲण्टिजेन टेस्ट बंद राहिल्याने आर्टिफिशियल टेस्टसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे.

तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांपेक्षा जास्त झाली आहे. मार्च महिन्यात आजपर्यंत ७०० पेक्षा जास्त रुग्ण तालुक्यात पॉझिटिव्ह निघाले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी शासनाच्या वतीने शहरातील व्यापाऱ्यांच्या ॲण्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. यात अनेक व्यापाऱ्यांनी टेस्टकडे पाठ फिरवल्याने नगर परिषद प्रशासनाने टेस्ट न करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांना दंड केला. परिणामी, व्यापारी सावध झाले व टेस्टसाठी अनेक जण प्रवृत्त झाले. याचा परिणाम मंडी बाजार परिसरातील नागरी रुग्णालय परिसरात टेस्ट करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

शासनाकडून ॲण्टिजेन तपासणीसाठी किट मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून आर्टिफिशियल टेस्ट करण्याचे सांगितले जात आहे. टेस्टसाठी मोठी गर्दी होत आहे. शहरात दररोज निघणारी कोरोनाची रुग्णसंख्या, या रुग्णांच्या ट्रेसिंगमधून निघालेले कुटुंबीय व संपर्कात आलेल्या व्यक्ती यांची वाढती संख्या व पुन्हा व्यापारी यामुळे नागरी रुग्णालयात मोठी गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीवर प्रशासनाचे कसलेही नियंत्रण नाही. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही शहरवासीयांची बेफिकिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना शासनाकडून दंड केला, तरीही याचा कसलाही परिणाम नागरिकांवर होत नसल्याचे समोर आले आहे. शहरातील मंडीबाजार, बसस्थानक परिसर, जुना पेट्रोलपंप परिसर, मोंढा बाजार, गुरुवार पेठ परिसर अशा सर्वच ठिकाणी चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या इथेही शहरवासीयांची मोठी गर्दी दिसून येते. मास्कचा वापर, सामाजिक अंतर याकडे शहरवासीयांचे कमालीचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. परिणामी, कोरोना संसर्गाची संख्या शहरात वाढतच चालली आहे. या गर्दीला प्रशासनाने वेळीच पायबंद घातला, तर संसर्गाचा धोका कमी होईल, अन्यथा पुन्हा संसर्ग वाढेल, याची दक्षता वेळीच घेणे गरजेचे आहे.

अन्यथा कडक कारवाई

अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शहरातील गर्दी रोखण्यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या उपाययोजना सुरू आहेत. व्यापाऱ्यांना ॲण्टिजेन चाचण्या करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. ॲण्टिजेन टेस्टसाठी कमी पडणारे किट उपलब्ध करून देण्यात येतील. नागरिकांनी बेफिकीरपणे न वागता कोरोनाच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी दिला आहे.

===Photopath===

240321\120624bed_5_24032021_14.jpg

Web Title: Increased apathy in Ambajogai causes corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.