बस प्रवासातील ओळख वाढवत दिले लग्नाचे आमिष; नोकरदार विधवा महिलेवर केला अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:46 IST2024-10-24T16:45:15+5:302024-10-24T16:46:22+5:30
पीडिता बीडची तर आरोपी पैठण येथील रहिवाशी; बीडमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल

बस प्रवासातील ओळख वाढवत दिले लग्नाचे आमिष; नोकरदार विधवा महिलेवर केला अत्याचार
बीड : बीडमधील रहिवासी असलेल्या विधवा महिला नोकरदाराची बस प्रवासात पैठणच्या प्रवाशासोबत ओळख झाली. नंतर याच प्रवाशाने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. ही घटना २०१५ नंतरच्या कालावधीत घडली. याप्रकरणी प्रवाशाविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
बीडमधील पीडिता ही विधवा असून एका विभागात नोकरी करते. तिची बीड ते पैठण यादरम्यान बसमध्ये असताना एका प्रवाशासोबत ओळख झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. दोघांचेही भेटणे, बोलणे सुरू झाले. नंतर तो प्रवासी महिलेच्या बीडमधील घरी येऊ लागला. त्याने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. काही महिन्यांपूर्वी त्याने दुसऱ्या मुलीशी विवाह केला. ही माहिती या विधवा महिलेला समजली. त्यानंतर तिने बीड शहर पोलिस ठाणे गाठत या प्रवाशाविरोधात फिर्याद दिली. त्यावरून अत्याचारासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास पिंक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे करत आहेत. अद्यापही अटक नसल्याची माहिती लांडगे यांनी दिली.