अल्पवयीन विवाहाचे वाढले प्रमाण; अंभोरा पोलिसांनी ऐनवेळी पोहचत रोखले दोन बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2023 05:58 PM2023-05-04T17:58:36+5:302023-05-04T17:58:50+5:30
आष्टीत तालुकास्तरावरील समितीचे दुर्लक्ष
- नितीन कांबळे
कडा (बीड) - बीड-नगर राज्य महामार्गावरील दोन मंगल कार्यालयात आज दुपारी अल्पवयीन मुलींचा विवाह होणार असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना मिळाली. यावरून दुपारी दोन्हीही बालविवाह अंभोरा पोलिसांनी रोखले आहेत.
आष्टी तालुक्यातील बीड-नगर राज्य महामार्गावरील दोन मंगल कार्यालयात दोन अल्पवयीन मुलींचे आज दुपारी लग्न होणार असल्याची माहिती चाईल्डलाईनला मिळाली. चाईल्डलाईनने याबाबत अंभोरा पोलिसांना माहिती दिली. यावरून कसलाही विलंब न करता सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, अंमलदार शिवदास केदार, धामणगांव येथील ग्रामसेवक सायंबर यांनी दोन्ही ठिकाणी धडक दिली. या ठिकाणी होणारे दोन्ही बालविवाह त्यांनी रोखले. तसेच दोन्ही मुलींच्या आई-वडिलांना लग्नाचे वय झाल्यानंतरच लग्न लावून देण्याची समज दिली.
दरम्यान, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत आहेत. तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या समितीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच तालुक्यात तालुक्यात अल्पवयीन मुलींचे विवाहांची संख्या वाढत असल्याच आरोप बालहक्क सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांनी केला आहे.