हृदयावर वाढता ताण; उच्च रक्तदाबाचे १६ हजार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:25 PM2019-09-28T23:25:17+5:302019-09-28T23:25:48+5:30
काम, व्यसन व मुख्य म्हणजे तणावामुळे नागरिकांच्या हृदयावर ताण वाढत असल्याचे समोर आले आहे.
सोमनाथ खताळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : काम, व्यसन व मुख्य म्हणजे तणावामुळे नागरिकांच्या हृदयावर ताण वाढत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात मागील १७ महिन्यात तब्बल १५ हजार ८८५ रुग्ण उच्च रक्तदाबाने ग्रासले आहेत. विशेष म्हणजे यात महिलांची संख्याही पुरूषांच्या बरोबरीने असल्याचे उघड झाले आहे. ३० ते ५० वयोगटातील महिला, पुरूषांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले.
उच्च रक्तदाबाची लक्षणे प्राथमिक पातळीवर दिसत नाहीत; मात्र तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हानी पोचवत असतो, म्हणून त्याला ‘सायलेंट किलर’ म्हणतात. हृदयाचे प्रमुख कार्य म्हणजे शुद्ध झालेले रक्त संपूर्ण शरीरभर पसरविणे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसा जोर व दाब असणे आवश्यक असते. या दाबालाच ‘रक्तदाब’ असे म्हणतात. उच्च रक्तदाब हा प्रामुख्याने आढळून येणारा आजार आहे. पूर्वी साठीच्या पुढे हा आजार दिसून येत असे; पण आता उच्च रक्तदाब हा तिशीतच डोके वर काढू पाहत आहे. स्त्री व पुरुषांची तुलना केल्यास ३० ते ४५ वयोगटांत पुरुषांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढलेले दिसून येते, तर ४० च्या पुढे स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) व अल्प रक्तदाब (हायपोटेन्शन) असे दोन प्रकार आहेत.
उच्च रक्तदाबाची कारणे / लक्षणे
कौटुंबिक इतिहास, वाढते वय, लिंग तसेच पर्यावरणीय घटक, खारट व तेलकट पदार्थांचे सतत सेवन, लठ्ठपणा, मद्यपान व धूम्रपानाचा अतिरेक, अनियमित व्यायाम, शरीराची कमीत कमी हालचाल, शारीरिक व मानसिक ताणतणाव, कमी झोप, मूत्रपिंड निष्क्रियता, मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांचे आजार, महाधमनी विच्छेदन, ब्रेन ट्यूमर, हृदय रक्तवाहिन्यांचे आजार ही उच्च रक्तदाबाचे प्रामुख्याने आढळून येणारी कारणे आहेत.
डोके जड होणे, कमीतकमी हालचालींनीही थकवा जाणवणे, डोळ्यांसमोर वारंवार अंधारी येणे, अस्वस्थ वाटणे, धाप लागणे, क्षुल्लक गोष्टींची भीती वाटून छातीत धडधड होणे, यासोबतच मळमळ, उलटी, आकडी, चक्कर वा बेशुद्धी अशी लक्षणेही आढळून येतात. जर उच्च रक्तदाब हा सिस्टोलिक १८० हून अधिक व डायस्टोलिक ११० हून अधिक असल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते.
हा आहार फायद्याचा
केळी (रोज एक सेवन करणे, कारण त्यात पोटॅशिअम जास्त असते), डाळिंब, मोसंबी, द्राक्ष (काळे द्राक्ष जास्त गुणकारी), पपई इ. तसेच पालक, टोमॅटो, बीट रूट, मेथी, कांदा, आवळा, लसूण (एक पाकळी रोज सकाळी) हा आजार फायद्याचा आहे तर मासे, अंडी हे वर्ज्य करणे गरजेचे आहे.