लॉकडाऊनमध्ये इंडिया पोस्ट बँकेकडून १९ हजार ग्राहकांना आधार, ४ कोटी ६९ लाखांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:26 AM2020-12-26T04:26:24+5:302020-12-26T04:26:24+5:30
बीड : जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत १९ हजार ३४२ व्यवहार झाले. सुमारे ४ कोटी ६९ ...
बीड : जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत १९ हजार ३४२ व्यवहार झाले. सुमारे ४ कोटी ६९ लाख ९२ हजार ९३७ रुपयांचे वाटप या सेवेतून करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये जाता येत नव्हते. नागरिकांची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत गावातील कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या पोस्टमनद्वारे मोबाईल व बायोमेट्रिक डिवाइसच्या सहाय्याने नागरिकांना राष्ट्रीयकृत आणि खाजगी ( जिल्हा मध्यवर्ती बँक आणि मराठवाडा ग्रामीण बँक वगळून) रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली होती. या सुविधेमुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टळली आणि नागरिकांना घरपोच सेवा डाक विभागाकडून मिळाली.१ सप्टेंबर २०१८ मध्ये बीड जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू झाली. या बँकेचे महत्त्व लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना समजले. गरीब कल्याण योजनेच्या खातेदारांना त्यांची रक्कम मिळाली. गरजेच्या काळात गॅस योजना व इतर शासकीय अनुदानाची रक्कम उपलब्ध झाली. कोरोनापासून बचावासाठी जवळच्या पोस्ट कार्यालयात खाते उघडण्याचे स्थानिक आवाहन प्रशासन व डाक विभागाने केले होते. आधार एनेबल पेमेंट सिस्टीमद्वारे ( इपीएस) ग्राहक गावात कोणत्याही बँकेचे पैसे विड्रॉवल करू शकत होता. या कालावधीत दिवसाकाठी तीन ते दहा लाख रुपयांपर्यंतची रक्कम इपीएस विड्रॉवल करण्यात आली. पोस्टमन बायोमेट्रिक डिव्हाइस घेऊन ग्राहकाच्या घरी जायचे आणि सुविधा उपलब्ध करून देत होते.
जिल्ह्यातील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत सुरुवातीपासून ते आतापर्यंत ७५ हजार ग्राहकांचे खाते आहेत. या वर्षात एप्रिल ते आतापर्यंत २५ हजार ३७५ खाते उघडले. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे ३११ पोस्ट ऑफिसद्वारे कामकाज होत आहे.
डाकिया पैसा लाया, हयातनामा भी दिया
मार्च ते जून या कालावधीत तीव्र तापमान असतानाही पोस्टमनने ग्रामीण भागातील दुर्गम क्षेत्रात जाऊन संबंधित ग्राहकांना पोस्ट पेमेंट बँकेची सुविधा उपलब्ध करून दिली. अनेक ठिकाणी झाडाखाली सावलीत बसून ग्राहकांना खाते उघडून देण्याची सुविधा बँकेमार्फत करण्यात आली. त्याचबरोबर बॅलन्स इन्क्वायरी मिनी स्टेटमेंट आणि नवीन खाते उघडण्याची कामे करतानाच सेवानिवृत्तांना हयातनामा देण्याची सेवा पोस्टमनद्वारे देण्यात आली.
विना तक्रार सेवेचे समाधान
कोरोनाच्या काळात विविध अडचणी असताना नागरिकांना ग्रामपातळीवर आर्थिक व्यवहार इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे करता आले. जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक आणि पोस्टमन यांनी गरजूंना विना तक्रार सेवा दिली याचे समाधान वाटते.
- नितीन पाटील, शाखा प्रबंधक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, बीड.
३५० ग्रामीण डाक सेवक आणि पोस्टमनने बजावली सेवा
४,६९,९२,९३७ रुपयांचे पोस्ट बँकेकडून घरपोच झाले वाटप.
१९,३४२ नागरिकांना घरपोच वाटप
३ हजार विद्यार्थ्यांनी पोस्टातून काढली शिष्यवृत्ती खाती
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लॉकडाऊनच्या काळात १६ हजार खाते उघडण्यात आले. यापैकी तीन हजार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे खाते या बँकेत उघडले असून इपीएसद्वारे व्यवहार केले.