इंदिराजींनी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:26 PM2020-01-29T23:26:25+5:302020-01-29T23:28:51+5:30
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे इंदिराजींचा पराभव झाला, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्या ध्येयधोरणावर टीका केली.
बीड : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे इंदिराजींचा पराभव झाला, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्या ध्येयधोरणावर टीका केली.
बीड येथे बुधवारी संविधान बचाओ संघर्ष समितीच्या महासभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मौलाना अबु तालीब रहमानी, माजी. न्या. बी. जी कोळसे पाटील, तिस्ता सेटलवाड, दीपसिता धार, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, अमरसिंह पंडित, सय्यद सलीम, उषा दराडे, सिराज देशमुख, प्रा. सुनील धांडे आदी उपस्थित होते.
आव्हाड म्हणाले, एखादा हिटलर जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो सर्वात जास्त बुद्धिवाद्यांना आणि विद्यार्थ्यांना घाबरतो, कारण बंडखोरी त्यांच्या अंगात असते म्हणूनच जेएनयुसह इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांवर हल्ले सुरू आहेत. आज विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल, परंतु हीच संख्या मोठी असल्याचे सांगत त्यांनी इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीचा संदर्भ दिला.
यावेळी आव्हाड यांनी ‘ना हिंदू , ना मुसलमान संविधान खतरे में है’ म्हणत मोदी- शहांवर टीका केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या बापजाद्यांनी रक्त सांडले, आम्हाला पुरावे मागणारे त्यावेळी कोठे होते, असा सवाल आव्हाड यांनी केला. भाजपला जे काय करायचं, ते करु द्या. एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान आणि मुखात जयभीमचा नारा देऊन देश विभक्त करण्याचे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन आव्हाड यांनी केले.
जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या दीपसिता धार, तिस्ता सेटलवाड यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या धोरणावर टीका केली.
देश अहंकाराने नव्हे, संविधानावर चालेल
मोदी- शहांवर टीका करताना मौलाना तालीब रहमानी म्हणाले, एकही इंच हटणार नाही म्हणणाऱ्यांना पळता भुई थोडी करु. तुम्ही चेहरे पाहतात, आम्ही तिरंग्याकडे पाहतो. आमच्या एका हातात कुराण आणि दुसºया हातात संविधान असेल. हजारो प्रयत्न केले तरी हा देश अहंकाराने नव्हे तर संविधानानुसार चालेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
जनशक्तीच्या बळावर क्रांती करू
न्या.बी.जी. कोळसे पाटील यांनी मोदी, शहा यांच्यावर टीका केली. आरएसएस देशाची शत्रू असून मोदी, शहा दलाल असल्याचे ते म्हणाले. साडेपाच वर्षात रोजगार संपला, बॅँका बुडाल्या, सामान्यांसाठीचे कायदे बासनात गुंडाळले. न्याय व्यवस्था नोकरशाही धोक्यात आली. सीएए, एनसीआर कायद्याविरोधात संघटितपणे लढा देण्याचे आवाहन केले