औद्योगिक वसाहतीत उद्योगाचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:06 AM2018-11-13T00:06:45+5:302018-11-13T00:07:35+5:30
मागील चौदा वर्षापासून धारूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एकही प्रकल्प उभा राहिला नव्हता; परंतु आता या वसाहतीमध्ये आधुनिक पद्धतीचा देशातील पहिला गूळ उद्योग उभारण्यात येत असून या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : मागील चौदा वर्षापासून धारूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एकही प्रकल्प उभा राहिला नव्हता; परंतु आता या वसाहतीमध्ये आधुनिक पद्धतीचा देशातील पहिला गूळ उद्योग उभारण्यात येत असून या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात आता येथील औद्योगिक वसाहतीला महत्त्व येणार असल्याचे चित्र दिसत आहे .
धारूर येथे औद्योगिक वसाहत उभी राहावी म्हणून अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी होती. ती पूर्ण करण्यासाठी तत्कालीन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नानंतर औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा होऊन शासनाने आडस रोडवरील ३३ एकर जागा अधिग्रहित केली होती . या जागेचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले होते. मागील चौदा वर्षांपूर्वी या वसाहतीचे भूमिपूजन जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु नंतर या जागेत आतापर्यंत एकही उद्योग उभा राहिला नव्हता. यासाठी नंतर राजकीय नेत्यांकडूनही पाठपुरावा झाला नाही. निवडणुका आल्या की औद्योगिक वसाहत उभी करू अशी आश्वासने दिले जात होती; मात्र प्रत्यक्षात काहीच होत नव्हते . काही शेतकºयांनी मात्र या जागेमध्ये पेरणी केली, तर काही जागा पडीक स्वरूपात राहिली.
धारूर येथील रहिवासी नामदेव गोरे यांची पुणे येथे सुभद्रा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. कंपनीमार्फत त्यांनी धारूर येथील औद्योगिक वसाहतीची जागा खरेदी करून ती ताब्यात घेतली आहे. या जागेमध्ये देशातील पहिला आधुनिक पद्धतीचा गूळ प्रकल्प ते उभा करणार आहेत. या प्रकल्पात विनाकेमिकल स्वरूपाचा गूळ तयार करण्यात येणार आहे. ७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच झाले.
औद्योगिक वसाहतीच्या जागेत हा प्रकल्प उभा राहत असल्याने या वसाहतीला महत्त्व आले आहे. हा प्रकल्प उभा राहिल्यास यातून धारूर व परिसरातील तरुणांच्या हाताला काम सुद्धा मिळणार आहे. औद्योगिक वसाहतीच्या जागेमध्ये उभा करण्यात येत असलेला प्रकल्प हा देशातील पहिला प्रकल्प असून, चार महिन्यांमध्ये या प्रकल्पाचे ट्रायल करण्यात येणार असल्याचे सुभद्रा कंपनीचे चेअरमन नामदेव गोरे यांनी सांगितले.