पात्रूडमध्ये जिवंत अर्भक नालीत फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:26 AM2018-11-19T00:26:00+5:302018-11-19T00:26:50+5:30
तालुक्यातील पात्रूड येथे नालीमध्ये एक दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांना रडण्याचा आवाज आल्याने हा प्रकार समोर आला. अर्भकाला तात्काळ बाहेर काढून माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येते. रूग्णालयात अनेक महिलांनी पुढाकार घेत त्याला मायेची ऊब दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील पात्रूड येथे नालीमध्ये एक दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांना रडण्याचा आवाज आल्याने हा प्रकार समोर आला. अर्भकाला तात्काळ बाहेर काढून माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येते. रूग्णालयात अनेक महिलांनी पुढाकार घेत त्याला मायेची ऊब दिली.
सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातून कुणाचा तरी आवाज येत असल्याचे स्थानिक नागरिकांना ऐकावयास आले. यावर त्यांनी नालीमध्ये पाहिले असता पुरूष जातीचे नवजात अर्भक असल्याचे दिसले. गावातील सामाजिक कार्यकर्ते शेख तौफीक, जफर कुरेशी यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिर्झा वाहब बेग यांना माहिती दिली. नागरिकांनी अर्भकाला तात्काळ उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रसाद कुलकर्णी यांनी तपासणी करून अर्भकाची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले. अर्भकाचे वजन ३ किलो असून, नाळ तोडलेली नसल्याने ते एक दिवसाचेच असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यावर पोलीस उपनिरीक्षक एस.डी.नरके, पोलीस नाईक राजेंद्र ससाणे, बापु मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
ही माहिती स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर त्यांनी रूग्णालय गाठत अर्भकाची पालकत्व स्विकारण्याची भावना पोलीस निरीक्षक मिर्झा वाहब बेग यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान बीड येथील चाईल्ड लाईन या संस्थेच्या प्रतिनिधींनी भेट दिली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महिनाभरात दुसरी घटना
गत दोन आठवड्यांपूर्वी केज येथेही एका दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात फेकून दिल्याचे आढळले होते.
याचा तपास बाकी असतानाच पात्रुडमध्ये पुन्हा तशीच घटना घडला आहे. अनैतिक संबंधातील बाळ असल्याने ते फेकून दिले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.