शेतकऱ्यांनो लक्ष द्या, उसावर विषारी अळीचा प्रादुर्भाव, संपर्कात आल्यास होतात असह्य वेदना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 02:16 PM2022-08-30T14:16:53+5:302022-08-30T14:20:37+5:30
उसावर विषारी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी त्रस्त
- अविनाश कदम
आष्टी (बीड) : शिराळ आणि शेरी येथे उसावरील अळीने अचानक चावा घेतल्याने शेतकऱ्यांना असह्य वेदना होऊन त्रास झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या अळीच्या प्रादुर्भावाने पिके संकटात आली असून शेतकरी देखील त्रस्त झाली आहेत.
तालुक्यातील शिराळ येथील शेतकरी आशुतोष आजबे हे आपल्या शेतात काम करीत असताना त्यांच्या हाताला एक विषारी अळी चावली. तसेच शेरी येथील वंदना ढोबळे यांना देखील गवत वेचत असताना पायाला अशाच प्रकारच्या अळीने चावा घेतला. यानंतर दोन्ही शेतकऱ्यांना तीव्र स्वरूपाच्या वेदना, खाज आली. दोन्ही रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. विंचू चावल्यावर जो वैद्यकीय उपचार करतात तशाच प्रकारची उपचार पद्धती वापरण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित लहाने यांनी दिली. तर कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन यावर उपाय सांगावा. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याची माहिती द्यावी अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक उंबरकर, महेश मुरकुटे यांनी केली आहे.
अळीचा प्रादुर्भाव कशामुळे होत आहे. हे शोधून त्यावर उपाय सांगावा असे आदेश कृषी विभागाला दिले आहेत.
- विनोद गुंडमवार, तहसीलदार आष्टी
असा करावा बंदोबस्त
प्रामुख्याने ऊस पिकावर ही अळी दिसून येत आहे. कृषी तज्ञांच्या मते ही अळी स्लज कॅटरपीलर आहे. या अळी चा माणसांच्या शरीरावर संपर्क आल्यास आग होणे, खाज येणे असा प्रकार होऊ शकतो. पिकांवर जास्त प्रमाण आढळून आल्यास डायक्लोरोवोस (नुवान) या कीटकनाशकाची 20 मिली प्रति पंप या प्रमाणे फवारणी करावी.
- गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी