महागाई दुप्पट अन् मजुरीत केवळ २३ रुपये वाढ; रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणे परवडेना
By शिरीष शिंदे | Published: April 5, 2024 12:50 PM2024-04-05T12:50:52+5:302024-04-05T12:52:15+5:30
महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजना अर्थात मनरेगा ही केंद्र व राज्य शासन यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
बीड : महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या संदर्भाने नुकतेच गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यात मजुरीसाठीचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या गोवा राज्यात प्रती दिन मजुरी ३५६ आहे, परंतु राज्यात मजुरी दर २९७ आहे. राज्यासह बीड जिल्ह्यातील मजुरीमध्ये केवळ २३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महागाईच्या जमान्यात रोहयो कामावर जाणे परवडत नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजना अर्थात मनरेगा ही केंद्र व राज्य शासन यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना सुरू करताना अनेक बाबी डोळ्यासमोर ठेवल्या गेल्या. गावातच जलसंधारणाची कामे, बांधबंदिस्ती दुरुस्ती, भूमिगत पाट, मातीची धरणे, समतल चर, मजगी घालणे, दगडी संरोधक, सिंचन कालवे, सिंचन तलाव, जलाशयांचे नूतनीकरण यासह अनेक कामे मनरेगा योजनांतर्गत केली जात आहेत. या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसादही मिळत आहे. मजुरी कमी असली तर कामाची हमी असल्याने अनेक जण या कामावर जात आहेत. बहुतांश वेळा काम करूनही मजुरी वेळेवर मिळत नसल्याची प्रकरणे मागच्या काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आधीच मजुरी कमी त्यात विलंब यामुळे मजुरांची कोंडी होत आहे. वास्तविकत: मजुरीमध्ये भरघोस वाढ करणे अपेक्षित होते. परंतु, कमी वाढ करून एका प्रकारे मजुरांची थट्टाच केली जात आहे. महागाई वाढत असल्याने गोरगरिबांना जीवन जगणे कठीण झाले आहे. हाताला काम पाहिजे हे सत्य असले तरी दिवसभर राबून मोजकेच रुपये मिळत असतील तर कशामुळे रोहयो कामावर जावे, असा प्रश्न मजुरांपुढे निर्माण झाला आहे.
कामावर जावे की नाही
महागाई वाढत चालली आहे, परंतु मजुरीमध्ये फारशी वाढ होत नसल्याने कामावर जावे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकामावर गेल्यास प्रती दिन मजुरी ३०० रुपयापेक्षा अधिक मिळते. रोहयोची मजुरी अधिक वाढली पाहिजे.
-संजय काळे, धानोरा
मजुरीत वाढ करा
रोजगाराची हमी आहे, गावाच्या जवळ किंवा गावातच काम मिळत असल्याने ही योजना लाभदायक आहे. परंतु, अकुशल मजुरी फारच कमी आहे. आजच्या घडीला प्रत्येक गोष्ट महागली आहे. घराबाहेर पडले की खर्चाला सुरुवात होते. त्यामुळे मजुरीत वाढ झाली पाहिजे.
-अलका कुदळे, येळंबघाट
प्रत्येक राज्याचा दर वेगवेगळा
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मजुरी कमी असल्याची ओरड प्रत्येक राज्यात आहे. परंतु, हे दर महागाईच्या तुलनेत कन्झ्युमर प्राइज इंडेक्सच्या कृषी मजुरीच्या आधारावर निश्चित करण्यात आलेले असतात. सध्याच्या कन्झ्युमर प्राइज इंडेक्स दर हा ७.७ असल्याने त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक राज्याचा दर हा वेगवेगळा असल्याने त्यानुसार मजुरी वाढवली असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
असे आहेत दर
राज्य- वाढलले मजुरीचे दर (रुपयांमध्ये)
आंध्र प्रदेश-३००
अरुणाचल प्रदेश-२३४
आसाम-२४९
बिहार-२४५
छत्तीसगढ-२४३
गोवा-३५६
हरियाणा-३७४
महाराष्ट्र-२९७