बीड जिल्ह्यात कडबा भडकला, शेतकरी ऊस विकू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:36 PM2018-09-21T17:36:23+5:302018-09-21T17:37:14+5:30

जिल्हयात पावसाने मोठी ओढ दिल्याने संभाव्य दुष्काळजन्य स्थितीमुळे पशुधनाच्या कडब्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत.

InIn Beed district, Blended collage prices increased, farmers started selling sugarcane | बीड जिल्ह्यात कडबा भडकला, शेतकरी ऊस विकू लागले

बीड जिल्ह्यात कडबा भडकला, शेतकरी ऊस विकू लागले

Next

बीड : जिल्हयात पावसाने मोठी ओढ दिल्याने संभाव्य दुष्काळजन्य स्थितीमुळे पशुधनाच्या कडब्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत. जूनमध्ये १७०० रुपये शेकडा मिळणारा कडबा सध्या २५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कडबा टंचाईमुळे पशुपालक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातील ऊस  जळून जाण्याआधीच उपटलेला ऊस शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. 

बीड जिल्ह्यात यावर्षी पावसाची अवकृपा राहिली. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४८ टक्के तोही अनियमित व विषम प्रमाणात झाला आहे. पीक परिस्थिती बिकट असतानाच पशुधन सांभाळणाऱ्या पालकांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. मागील वर्षी पाऊसप्रमाण चांगले राहिल्याने जलसाठ्यात वाढ झाली. समाधानकारक पातळीमुळे पाण्याची टंचाई भासली नाही. परंतू यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. त्यामुळे आॅगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. तर चाऱ्याची मुबलक उपलब्धता होती. त्यामुळे मे- जूनमध्ये कडब्याचे भाव शेकडा १७०० ते २००० रुपये इतके होते. बीडमध्ये नगर, उस्मानाबाद जिल्ह्यातून कडब्याची आवक बऱ्यापैकी होती. नंतर मात्र पाऊस नसल्याने व दुष्काळी चाहूल लागल्याने कडब्याचा पुरवठा कमी होऊ लागला आहे. 

दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याने संभाव्य परिस्थिती लक्षात घेत कडब्याच्या दरात तेजीचे वारे सुरू आहेत. सध्या येथील बाजारात कडब्याचे भाव शेकडा २५०० ते २६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.  कडब्याचे दर १७०० वरून २५०० पर्यंत पोहोचले आहेत, तर वाढ्यासह उसाचे भाव १७०० ते १८०० रुपये आहेत. त्यामुळे कडब्याच्या जागी उसालाही पशुपालक पसंती देत आहेत. पशुधन जगविण्यासाठी पशुपालकांची कसरत सुरु आहे.

बीड येथील मंडईत कोल्हारवाडी, इमामपूर, वायभटवाडी, बीड, काठोडा, पिंपळनेर तसेच तालुक्यातील इतर गावातून शेतकरी कडबा खरेदीसाठी येतात. कडब्याचे भाव लक्षात घेत पशुपालकांनीही आखडते घेतले आहे. लागेल त्यापेक्षा कमी प्रमाणात कडबा खरेदी करतात, असे मधुकर चांदणे म्हणाले. 
सध्या उत्पादक व मोठ्या व्यापाऱ्यांकडून कडबा पुरवठा कमी होत आहे. पावसावरच भिस्त आहे. पाऊस चांगला झाल्यास कडब्याचे भाव शेकडा १५०० ते २००० रुपये होऊ शकतात, असे सय्यद बाबूभाई यांनी सांगितले. पाऊस परिस्थतीचा अंदाज घेत काही उत्पादक शेतकरी त्यांच्याकडील कडब्याचा स्टॉक तसेच ठेवणे पसंत केले आहे. आणखी तेजीची त्यांना शक्यता आहे. 

एकीकडे कडब्याचे भाव वाढत असताना दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी पावसाअभावी ऊस वाळून जात असल्याने तसेच हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्याने नुकसान होण्यापेक्षा येथील कडबा मंडईत वाढ्यासह ऊस विक्रीस आणत आहेत. तालुक्यातील १५ ते २० शेतकरी आर्थिक गरजेनुसार त्यांचा ऊस स्वत: विकत आहेत. 

व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ; कामगारांचा रोजगार घटला
बीड येथील कडबा मंडईत लहान- मोठे २० पेक्षा जास्त व्यापारी आहेत. तर २५-३० कामगार हमाली व इतर कामातून गुजराण करतात. सध्या कडबा मिळत नसल्याने व उपलब्ध कडबा महाग असल्याने तसेच भांडवली गुंतवणूक वाढल्याने या व्यवसायातील काही जण इतर व्यवसायांकडे वळले आहेत. तर आवक घटल्याने कामगारांचा रोजगार घटल्याचे शेख मजहर म्हणाले.

Web Title: InIn Beed district, Blended collage prices increased, farmers started selling sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.