बालाघाट हिरवागार करण्यासाठी बीजांकुर ग्रुपचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:17+5:302021-07-22T04:21:17+5:30
३० गावांमध्ये रोज १०० झाडे लावून जगविण्याचा संकल्प बीड : कोरोनाकाळात ऑक्सिजनची किंमत प्रत्येकाला जाणवली आहे. तसेच मागील काळात ...
३० गावांमध्ये रोज १०० झाडे लावून जगविण्याचा संकल्प
बीड : कोरोनाकाळात ऑक्सिजनची किंमत प्रत्येकाला जाणवली आहे. तसेच मागील काळात वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्यामुळे वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी नेकनूर परिसरातील काही प्रशासकीय अधिकारी व तरुणांनी मिळून बीजांकुर नावाची मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून रोज १०० झाडे लावण्याचा उपक्रम या मोहिमेच्या माध्यमातून राबविला जात आहे. तसेच झाडे जगविण्यासाठी गावातील नागरिकांवर जबाबदारी दिली जात आहे. यामधून वृक्षसंवर्धनाच्या संदर्भात जनजागृती केल्यामुळे ग्रामस्थांचाही या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मागील वर्षी नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्यासह अशोक शिंदे, मनोज गव्हाणे, सुरेश रोकडे, रामनाथ घोडके, अमोल नवले यांच्यासह ‘मॉर्निंग टी’ आणि ‘बीजांकुर ग्रुप’ यांनी नेकनूरसह परिसरात बीजारोपण व वृक्षारोपण करीत झाडांचे महत्त्व अधोरेखित केले होते. या मोहिमेची आता चळवळ व्हावी यासाठी या ग्रुपच्या वतीने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे अनेक गावांमधून मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता हरित गावे हा उपक्रम राबविण्यात सुरुवात केली असून, याचा प्रारंभ तालुक्यातील कळसंबर येथून झाली. ग्रामस्थांनी वड, पिंपळ, लिंब यांचे वृक्षारोपण करून ते जतन करण्याचा संकल्प केला आहे.
गेल्या वर्षी डोंगरमाथ्यावर ७५ हजार बीजरोपणासह नेकनूर बाजारतळ, चाकरवाडी, मांडवखेल, भंडारवाडी येथे हजारो झाडांची लागवड केली होती. ती झाडे आता मोठी झाली आहेत. या वर्षी मात्र, नेकनूर पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या ३० गावांमध्ये १५ जुलै ते १५ ऑगस्ट या एका महिन्याच्या काळामध्ये रोज १०० याप्रमाणे ३००० झाडे लावून ती ग्रामस्थांच्या सहकार्याने जोपासण्याचे काम हाती घेत ‘हरित गावे’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या चळवळीमुळे मोठ्या प्रमाणत वृक्षांची लागवड होणार असून, पुढील काळात निसर्गसंवर्धन होण्यास मदत होणार आहे.
रोपांचा केला जातो पुरवठा
गावांमध्ये वृक्षारोपण करायचे असल्यास बीजांकुर ग्रुपच्या वतीने त्या गावांमध्ये रोपांचा पुरवठा केला जातो. तसेच ग्रुपमधील सदस्य त्या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांसबोत वृक्षारोपण करतात. तसेच ग्रामस्थांमध्ये वृक्षसंवर्धनाची गरज याविषयी जनजागृती केली जाते.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणत सहभागी व्हावे
बालाघाट परिसरातील डोंगर बोडके झालेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. दरम्यान, ग्रामीण भागातही वृक्षलागवड करणे गरजेचे असून, ‘हरित गाव’ या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन वृक्षलागवड करावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केले आहे.
200721\565620_2_bed_8_20072021_14.jpg~200721\565920_2_bed_7_20072021_14.jpeg
ग्रमस्थांच्या मागणीनुसार रोपांचा पुरवठा केला जातो.~डोंगर रांगावर वृक्षारोपण करताताना सपोनि लक्ष्मण केंद्रे, अशोक शिंदे, गोरख वाघमारे, रामनाथ घोडके, मनोज गव्हाणे, सुरेश रोखडे, अमोल नवले यांच्यासह बिजांकूर गृपचे सदस्य व ग्रामस्थ दिसत आहेत.