अंबाजोगाईत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून नागरिकांना होणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:35+5:302021-07-10T04:23:35+5:30
सुंदर माझे कार्यालय अभियाना अंतर्गत तहसील कार्यालयात उपक्रम अंबाजोगाई : सुंदर माझे कार्यालय अभियानांतर्गत अंबाजोगाई तहसील कार्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थी ...
सुंदर माझे कार्यालय अभियाना अंतर्गत तहसील कार्यालयात उपक्रम
अंबाजोगाई : सुंदर माझे कार्यालय अभियानांतर्गत अंबाजोगाई तहसील कार्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थी निर्माण करण्यात आलेल्या मदत कक्षाच्या माध्यमातून नागरिकांची गैरसोय दूर करणार आहेत. भारतीय जैन संघटना, तहसील कार्यालय व गटशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या पुढाकारातून या मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.
शुक्रवारी या उपक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके, प्रभारी तहसीलदार गणेश सरोदे, भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष धनराज सोळंकी, तालुका अध्यक्ष निलेश मुथा, गटशिक्षण अधिकारी चंदन कुलकर्णी, प्रा. संध्या ठाकरे, नायब तहसीलदार रेणुका कोकाटे, आधार माणुसकीचा संस्थेचे अध्यक्ष ॲड. संतोष पवार, शंकर बुरांडे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मंजूषा मिसकर म्हणाल्या की, शासकीय योजना राबविताना लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या योजनांच्या माध्यमातून प्रशासकीय कार्यपद्धती सुलभ होणार आहे. महाविद्यालयीन युवकांनाही आपले समाजाप्रति योगदान देता येणार आहे.
यावेळी शरद झाडके म्हणाले की, कोरोना काळातही लोकसहभागातून रुग्णालयास मोठी मदत झाली. आता सामान्य माणसाला त्यांची कामे सुलभ व लवकर व्हावीत, यासाठी हा कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्यक्ष योजनांची माहिती, अर्ज तयार करणे, ज्येष्ठ नागरिक यांना मदत ही कामे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सहज होतील. या विद्यार्थ्यांना सर्व बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कामी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून या मदत कक्षाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सरोदे यांनी केले. संचालन मंजूषा खडके यांनी तर उपस्थितांचे आभार चंदन कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
090721\1541-img-20210709-wa0033.jpg
उदघाटन करताना अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर,उपजिल्हाधिकारी शरद झाडके,तहसीलदार गणेश सरोदे,धनराज सोळंकी,चंदन कुलकर्णी,व उपस्थित