ग्रामस्थांनीच घेतला पुढाकार, प्रथमच बिनविरोधसाठी यशस्वी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:00+5:302021-01-02T04:28:00+5:30
परळी : गावकऱ्यांनी ठरविल्यामुळेच तालुक्यातील रेवली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील सदस्य पदाच्या ...
परळी : गावकऱ्यांनी ठरविल्यामुळेच तालुक्यातील रेवली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील सदस्य पदाच्या एकूण ९ जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत. या ८ जागांसाठी केवळ ८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता निवडणूक बिनविरोध झाल्याची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. गावच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. विकासासाठी व गावात गेल्या पाच वर्षांत झालेल्या परिवर्तनामुळे ग्रामस्थांनी रेवली ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निश्चय केला. त्यादृष्टीने सर्वांनीच केलेल्या प्रयत्नांना बहुतांश प्रमाणात यश आले असून, केवळ एका जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.
परळी तालुक्यातील सिरसाळ्यापासून जवळच असलेल्या रेवली गावाची मतदार संख्या अडीच हजारांच्या आसपास असून, या गावात पाचशेच्या जवळपास घरे आहेत. दुष्काळी भागातील रेवलीत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. उत्पन्नाचे साधनही मोठे नव्हते. परंतु, गेल्या पाच वर्षात सरपंच मनोहर केदार यांनी सर्वांना विश्वासात घेऊन सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. गावात अमूलाग्र बदल घडवून आणला. रेवली शिवारात जमिनीत पावसाच्या पाण्याचे नियोजन केले. चर खोदले तसेच बंधारे बांधल्यामुळे सिंचन क्षमता वाढली. शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड सुरू केली. पिण्याच्या पाण्यासाठी भारत निर्माण योजनेतून प्रयत्न केले. ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. जिल्हा परिषद शाळा सुधारण्याचाही प्रयत्न केला. अंगणवाडी बांधली, गावात रस्ते केले. रेवली डाक तांडा रस्त्याचे कामही केले. यामुळे ग्रामस्थांनी सरपंच केदार यांच्या कामावर विश्वास व्यक्त करत यावेळची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले.
नऊपैकी आठ जागा बिनविरोध
बिनविरोध उमेदवारांमध्ये रेखा मनोहर केदार, वैजनाथ माणिक कांदे ,आशा कांदे, शकुंतला रतन कवडे, अण्णासाहेब शत्रुघ्न मोठे, आशा उत्तम उपाडे, सुनिता ज्योतीनाथ कांदे, शेषराव लक्ष्मण बनसोडे यांचा समावेश आहे. नऊपैकी आठ जागा बिनविरोध झाल्याने गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत परळी तहसील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला.