अभिनव उपक्रम; बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उभारणार सुसज्ज व्यायामशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 11:56 PM2019-11-24T23:56:22+5:302019-11-24T23:56:45+5:30
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कामांचा ताणतणाव कायमच असतो. या धकाधकीच्या आयुष्यात त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी ...
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कामांचा ताणतणाव कायमच असतो. या धकाधकीच्या आयुष्यात त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयात सुसज्ज व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे. याचे काम प्रगतीपथावर असून, १० ते १५ दिवसात व्यायामशाळा अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी खुली करण्यात येईल.
जिल्हास्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये कामाचा ताण अधिकारी व कर्मचा-यांना असतो. यामध्ये अनेकवेळा स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. बराच काळ एकाच जागेवर बसून कर्मचाºयांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढल्याचे दिसून आलेले आहे. कर्मचाºयांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, रोजच्या दिनचर्यामध्ये आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम, योगा करणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकारी आणि कर्मचाºयांसाठी अद्ययावत, सुसज्ज व्यायामशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या व्यायामशाळेत अधिकारी व कर्मचारी सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन कामकाजाची वेळ सोडून व्यायाम करु शकणार आहेत. ही व्यायामशाळा वातानुकूलित असून, यामध्ये सर्व सोयीसुविधा असणार आहेत. तसेच योग्य प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक देखील या व्यायामशाळेत असतील. जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या अभिनव उपक्रमाचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे. यामुळे अधिक ऊर्जेने काम करण्याची क्षमता शासकीय कर्मचा-यांमध्ये येईल, अशी अपेक्षा आहे.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून संतुलित आहाराच्या संदर्भात तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे. त्याद्वारेत्यांना आवश्यक असणाºया बाबींची माहिती दिली जाईल. यामुळे अधिकारी व कर्मचा-यांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार आहे.
राज्यातील पहिला उपक्रम
विविध खाजगी कंपन्यांमध्ये कर्मचा-यांसाठी व्यायामशाळा उभारल्याचे आपण ऐकले आहे. मात्र, प्रशासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचा-यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील अद्ययावत व्यायामशाळा उभारण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.