तपासणी मोफत, पण औषधी विकत; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला बीड जिल्हा रुग्णालयात केराची टोपली
By सोमनाथ खताळ | Published: February 12, 2024 02:19 PM2024-02-12T14:19:38+5:302024-02-12T14:24:07+5:30
जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून चिठ्ठीवर लिहून दिलेल्या गोळ्या घेण्यासाठी औषधी भांडारमध्ये गेल्यावर मोजक्याच गोळ्या हातावर टेकवल्या जात आहेत.
बीड : १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सर्व तपासण्या व औषणधी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतू जिल्हा रूग्णालयात सुरूवातीपासूनच औषधींचा तुटवडा आहे. सोमवारीही माहिती घेतली असता तपासणी मोफत केली जात आहे, परंतू औषधींसाठी खासगी मेडिकल्सचा रूग्णांना आधार घ्यावा लागत आहे. यात रूग्णांची आर्थिक लुट होत आहे. या प्रकाराने संताप व्यक्त होत असून मुख्यमंत्र्यांच्या मोफत सुविधेची घोषणा सध्या तरी हवेतच असल्याचे दिसत आहे.
जिल्हा रूग्णालयातील औषधांचा मागील आठवड्यातच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी सर्व विभागप्रमुख, वॉर्ड इन्चार्ज यांची बैठकही घेतली. जे औषधी उपलब्ध आहेत, तेच रूग्णांना लिहून द्या, अशा स्पष्ट सुचना डॉ.बडे यांनी डॉक्टरांना दिल्या होत्या. परंतू या सुचनांचे कोणीही पालन करत नसल्याचे सोमवारी दिसून आले. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून चिठ्ठीवर लिहून दिलेल्या गोळ्या घेण्यासाठी औषधी भांडारमध्ये गेल्यावर मोजक्याच गोळ्या हातावर टेकवल्या जात आहेत. इतर गोळ्या बाहेरून घ्या, असा सल्ला फार्मासिस्टकडून दिला जात आहे. या प्रकाराने मात्र, सामान्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी रूग्णांमधून होत आहे.
रूग्ण काय म्हणतात...
माझा भाचा बीडमध्ये हाॅस्टेलवर आहे. त्याची तपासणी करूना त्याला चार गोळ्या व एक बॉटल लिहून दिली. एक बाॅटल आणि दोन गोळ्या दिल्या, पण दोन दिल्याच नाहीत. बाहेरून घ्या, असे तेथील फार्मासिस्टने सांगितले. माझ्यासाररखेच इतरांनाही सांगत होते. आमची परिस्थिती गरीब असल्यानेच आम्ही सरकारी रूग्णालयातील मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी आलो होतो. पण येथे औषधी बाहेरून घ्या, असे सांगतात, असे पांडूरंग शिंदे यांनी सांगितले. अशाच संतप्त प्रतिक्रिया इतरांनीही व्यक्त केल्या.
आरोग्य मंत्री नॉट रिचेबल, विरोधक आक्रमक
या प्रकरणात आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंंत यांना संपर्क साधला. परंतू त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते म्हणाले, ही गंभीर बाब आहे. यावर आम्ही आवाज उठवू. उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, असे असेल तर चुक आहे, मी लगेच माहिती घेते. असे सांगितले.
सीएसने दखल घेतली, पण...
यापूर्वीही अशाच तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांनी दखल घेत तात्काळ बैठक घेत पत्र काढले. त्यानंतर सोमवारीही माहिती झाल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवून खात्री केली. यावेळी मोजक्याच औषधी या भांडार विभागातून दिल्या जात असल्याचे पहावयास मिळाले. त्यावरून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पत्राचा आणि बैठकीला डॉक्टरांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसत आहे. डॉ.बडे यांना थोडं आक्रमक होऊन अशाप्रकारे रूग्णांना बाहेर पाठविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे.