तेलगाव ट्रामा केअर सेंटरची दोन तहसीलदारांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:35+5:302021-04-26T04:30:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : तालुक्यातील तेलगाव येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसह कोविड केअर सेंटर सुरू करणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : तालुक्यातील तेलगाव येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसह कोविड केअर सेंटर सुरू करणे प्रशासनाला सहज शक्य असल्याबाबत ‘लोकमत’ने रविवारी सविस्तर वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. रविवारी धारूरच्या तहसीलदार वंदना शिडोळकर व माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी या ट्रामा केअर सेंटरची पाहणी केली. येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी धारूर व माजलगाव येथील तहसीलदारांना रविवारी संयुक्त पाहणी करण्याची सूचना करून तत्काळ कोविड सेंटरचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार तहसीलदार शिडोळकर व पाटील यांनी ट्रामा केअर युनिट आणि व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी तेलगावचे सरपंच दीपक लगड, विठ्ठलराव लगड, बापूराव लगड, आदी उपस्थित होते.
तेलगाव येथील ट्रामा केअर सेंटर ऑक्सिजन बेडसह सर्व सुविधा असणारे रूग्णालय असताना, महसूल व आरोग्य विभागाकडून दुर्लक्षित होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथे जर कोविड केअर सेंटर तयार केले तर ३० गावांमधील रूग्णांची सोय होऊ शकते, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत ‘लोकमत’ने याविषयीचे वृत्त दिले होते.
===Photopath===
250421\img-20210425-wa0106_14.jpg