जाहीर केलेली मानधनवाढ तात्काळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:15 AM2019-06-08T00:15:19+5:302019-06-08T00:16:40+5:30
शासकीय कर्मचा-याचे वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्यावतीने जिल्हा परिषदेवर शुक्रवारी रोजी भव्य मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अंगणवाडी सेविका व मदतनिसांना केंद्र शासनाच्या वतीने जाहीर केलेली मानधनवाढ तत्काळ द्यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचा-याचा दर्जा देण्यात यावा. त्यांना शासकीय कर्मचा-याचे वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्यावतीने जिल्हा परिषदेवर शुक्रवारी रोजी भव्य मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांना दिले. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना केंद्र शासनानेगेल्या वर्षी मानधन वाढ जाहीर केली आहे. मात्र तिजोरीत खडकडाट असल्याचे कारण पुढे करत त्यांना मानधनवाढीपासून राज्य शासन वंचित ठेवत आहे. ३० एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या, काढून टाकलेल्या अंगणवाडी सेविका मदतनिसांना सेवासमाप्तीनंतरचा एकरकमी लाभ अनेक कर्मचाºयांना देण्यात आलेला नाही. तो त्यांना तात्काळ द्यावा. थकीत इंधन बिल त्वरित देण्यात यावे. कॅश प्रणाली कामकाज न येणा-या अंगणवाडी सेविकांना कामावरुन कमी करण्यात येऊ नये, त्यांना जुन्या पध्दतीने कामकाज करण्याची संधी देण्यात यावी. बँक खात्याशी आधार लिंक न झालेल्या कर्मचाºयांचे चार महिन्यांपासून रखडलेले मानधन तात्काळ द्यावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर हजारोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचाºयांनी मोर्चा काढला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, जिल्हाध्यक्ष कमल बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हा संघटक सचिन आंधळे, रजिया दारुवाले यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस उपस्थित होत्या. या मोर्चाची दखल न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला.