न्यायाऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी केला अपमान; माता मृत्यू प्रकरणी एखंडे कुटुंबाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 07:04 PM2019-01-03T19:04:20+5:302019-01-03T19:06:08+5:30
जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा नातेवाईकांचा आरोप
बीड : डॉक्टर व परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाला. दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांपुढे गेलो. मात्र, आम्हाला न्याय देण्याऐवजी त्यांनी आमचा अपमान केला, असा आरोप मीरा एखंडे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.
माजलगाव ग्रामीण रुग्णालयात मीरा एखंडे (रा. जिजामाता नगर, माजलगाव) यांचा आठव्या प्रसुतीवेळी बाळासह मृत्यू झाला होता. त्यानंतर मीराचे पती रामेश्वर, ७ मुली, भाऊ रत्नेश्वर घनचक्कर व विविध संघटनांचे पदाधिकारी निवेदन घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. संबंधित डॉक्टर व परिचारिकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आमची बाजू ऐकून न घेता तुम्ही ८ मुले कशी होऊ देता ? तुम्हीच गुन्हेगार होऊ शकता असे म्हणत अपमानास्पद वागणूक दिली. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रामेश्वर एखंडे यांनी केला. पत्रकार परिषदेला रामेश्वर यांच्यासह त्यांच्या मुली, मेहुणा, इतर नातेवाईक व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आम्ही गर्भपात केलाच नाही
डॉक्टरांनी ७ मुली झाल्यानंतर दोन वेळा गर्भपात केला अशी अफवा उठवली. मात्र, आम्ही एकदाही गर्भपात केलेला नाही. डॉक्टरांकडून खोटी माहिती दिली जात असल्याचा आरोपही रामेश्वर एखंडे यांनी केला.
डॉक्टर साबळेंकडून धमकी
घटना घडल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी आम्हाला अरेरावी केली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे हे रुग्णालयात आले. त्यांनीही आम्हाला धमक्या दिल्या. या संदर्भात आम्ही पोलिसात तक्रारही दिल्याचे रामेश्वर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उच्चस्तरीय चौकशी करा
या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकांऐवजी आरोग्य संचालक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरुन पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधितावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंब, नातेवाईकांसह विविध संघटनांना सोबत घेऊन उपोषण करण्याचा इशारा एखंडे यांनी दिला आहे.