परळी तालुक्यात पाच ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:21+5:302021-05-22T04:31:21+5:30
परळी : ग्रामीण भागात जे कोरोना बाधित आहेत पण व लक्षणे नाहीत अशा ग्रामस्थांना तालुक्यातील प्राथमिक ...
परळी : ग्रामीण भागात जे कोरोना बाधित आहेत पण व लक्षणे नाहीत अशा ग्रामस्थांना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद शाळेत दाखल केले जाणार आहे. त्यादृष्टीने परळी तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गृहविलगीकरणाची परवानगी रद्द करून संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून परळी पंचायत समितीच्या कार्यालयात शुक्रवारी आशा स्वयंसेविकांची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे व गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी बैठक घेतली. या बैठकीस २०० आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. परळी तालुक्यातील गावोगावी जाऊन बाधित रुग्णांचे सर्वेक्षण करून प्राथमिक आरोग्य केंद्रांना यादी सादर केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात परळी तालुक्यातील नागापूर, मोहा, सीरसाळा, धर्मापुरी, पोहनर या पाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्ष दोन दिवसात केले जाणार आहे. त्यानंतर परळी तालुक्यातील आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. कोरोना प्रादुर्भावाचा संसर्ग वाढू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती डॉ. लक्ष्मण मोरे यांनी दिली. तसेच कोरोना चाचणी तपासणीचे प्रमाणही वाढविण्यात येणार आहे. ज्या गावात कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी रुग्णवाहिका पाठविण्यात येईल व तीन आरोग्य कर्मचारी अँटिजन टेस्ट करतील तसेच लसीकरणाच्या नोंदणीसाठीही आशा स्वयंसेविका गावोगावी जाऊन गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन जनजागृती करणार आहेत.