माजलगावातील बँकांना पीक कर्ज तत्काळ वाटपाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:02+5:302021-07-31T04:34:02+5:30
माजलगाव : तालुक्यात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची चाललेली हेळसांड थांबवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकाराने प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर तहसीलदार वैशाली ...
माजलगाव : तालुक्यात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची चाललेली हेळसांड थांबवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकाराने प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर तहसीलदार वैशाली पाटील यांनी सर्व बँकांची बैठक घेऊन पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेतला. त्यानंतर बँकांनी तत्काळ कर्ज वाटप करावे तर, शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.
माजलगाव तालुक्यातील सर्व राष्ट्रीयीकृत दर्जाच्या बँकांना नोटीस काढून शुक्रवारी सकाळी पीक कर्जाबाबत आढावा घेण्यासाठी बँकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील बँक निहाय सर्व शाखांकडे आलेले अर्ज , मंजूर तसेच वाटप केलेले पीक कर्ज, येणाऱ्या अडचणींबाबत तहसीलदारांनी सविस्तर आढावा घेतला. पीक कर्जापासून वंचित पात्र शेतकऱ्यांना योग्य वागणूक देऊन तत्काळ नियम तसेच पीक लागवडीप्रमाणे कर्ज वाटप करण्याची मागणी ॲड. गोले यांनी केली. तर, बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात तसेच शेतकऱ्यांनी देखील बँकांच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, सुरळीत कर्ज वाटपास मदत करावी असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले.
यावेळी तालुक्यातील विविध बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांसह संभाजी ब्रिगेडचे नेते विजय दराडे, ॲड. पांडुरंग गोंडे, शेकापचे भाई लहू सोळंके, निलाराम टोळे, बाळासाहेब मिसाळ, बाळासाहेब टेकाळे, छत्रभुज ताकट, बाबूराव कोल्हे, माउली चंदनशिव, राजू भाऊ जाधव, सिद्धेश्वर गायकवाड, मुंजा पांचाळ, समाधान पोळ यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
300721\purusttam karva_img-20210730-wa0015_14.jpg