उपनिरीक्षक ते अपर अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना तुटपुंजा गणवेश भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:38 AM2021-08-21T04:38:05+5:302021-08-21T04:38:05+5:30
बीड : पोलीस दलात अधिकारी, अंमलदार तसेच आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात मोठी तफावत आहे. आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना वर्षाकाठी ...
बीड : पोलीस दलात अधिकारी, अंमलदार तसेच आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात मोठी तफावत आहे. आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना वर्षाकाठी २० हजार रुपये मिळतात. शिपाई ते सहायक उपनिरीक्षक पदावरील अंमलदारांना प्रतिवर्षी ५ हजार १६७ रुपये भत्ता दिला जातो. मात्र, उपनिरीक्षक ते अपर अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांची चार वर्षांतून एकदा केवळ पाच हजार रुपयांत बोळवण केली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
खाकी वर्दी ही पोलिसांची खरी ओळख आहे. खाकी वर्दी म्हणजे समर्पणाचे प्रतीक मानले जाते. मात्र, पोलिसांची शान असलेल्या गणवेश भत्त्यातच उपनिरीक्षक ते अपर अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. सगळ्यात तळाशी असलेल्या पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना वर्षाकाठी ५ हजार १६७ रुपये गणवेश भत्ता दिला जातो, तर उपनिरीक्षक ते अपर अधीक्षक पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना चार वर्षांतून एकदा ५ हजार रुपये इतके तोकडे अनुदान कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना दरवर्षी २० हजार रुपये गणवेश भत्ता देण्यात येतो. त्यामुळे उपनिरीक्षकांपुढील अधिकाऱ्यांवरच अन्याय होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे शिपाई ते महासंचालक पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांचे ड्रेस कोड ठरलेले आहेत. त्यामुळे जसजशी बढती मिळत जाते, तसतसे त्या पदाचा गणवेश परिधान करावा लागतो. मात्र, उपनिरीक्षकांवरील अधिकाऱ्यांना गणवेशासाठी भुर्दंड सहन करावा लागत आहे.
....
अडीच वर्षांपासून रखडला प्रस्ताव
उपनिरीक्षक ते अपर अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करून दरवर्षी सहा हजार रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाने १० जानेवारी २०१९ रोजी राज्याच्या अपर मुख्य सचिवांकडे पाठविला होता. मात्र, अद्याप या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी १८ ऑगस्ट रोजी पुन्हा अपर मुख्य सचिवांना पत्र पाठवून गणवेश भत्त्यात वाढ करण्याची विनंती केली आहे.
.......