डॉक्टरांना अरेरावी अन् शिवीगाळ; राजकारण्यांनो हे कसले शौर्य?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:39 AM2021-09-12T04:39:01+5:302021-09-12T04:39:01+5:30
बीड : कोरोना लसीकरणावरून आता गावपातळीवर वाद वाढू लागले आहेत. अपुरी लस आल्याने सर्वांना ती मिळत नाही. त्यामुळे स्थानिक ...
बीड : कोरोना लसीकरणावरून आता गावपातळीवर वाद वाढू लागले आहेत. अपुरी लस आल्याने सर्वांना ती मिळत नाही. त्यामुळे स्थानिक पुढारी, नेते, लोकप्रतिनिधी हे डॉक्टरांसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट करू लागले आहेत. काही ठिकाणी तर डॉक्टरांना शिवीगाळ केल्याच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. मागील काही दिवसांत वाद घालण्याचे प्रकार वाढत असले तरी तक्रार देण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याचे दिसते.
जिल्ह्यात सध्या मागील काही दिवसांपासून कोरोना लसीकरणाबाबत तक्रारी वाढू लागल्या आहेत. आतापर्यंत ११ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. सध्या लसीचा साठा जास्त प्रमाणात होत असल्याने आरोग्य विभागाकडून गावात जाऊन १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जात आहे. परंतु जे लोक उशिरा येऊन आम्हाला लस मिळाली नाही, अशी तक्रार करतात, त्यांच्याकडून डॉक्टरांसह, कर्मचाऱ्यांना अरेरावी करून शिवीगाळ केली जात आहे. काही ठिकाणी तर अंगावर धावून जाण्याचे प्रकारही वाढले आहेत. परंतु नोकरीचा प्रश्न असल्याने आणि रोजच किती तक्रारी करणार, या मानसिकतेतून आतापर्यंत तरी कोणी पोलीस ठाण्याची पायरी चढलेली नाही. परंतु स्थानिक राजकारण्यांनी परिस्थितीचा सामना करून आरोग्य विभागाला सहकार्य करावे, चुकीचे होत असेल तर रीतसर लेखी तक्रार करणे गरजेचे आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी लस आहे, तेथे जाऊन लस घ्यावी, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.
ही घ्या उदाहरणे...
१ - आष्टी तालुक्यातील टाकळसिंग आरोग्य केंद्रांतर्गत एका गावात लसीकरण शिबिर घेतले होते. तेथे १४० डोस दिले होते. परंतु ते लवकरच संपले. त्यामुळे एका स्थानिक पुढाऱ्याला लस मिळाली नाही. त्याने वैद्यकीय अधिकाऱ्याला कॉल करून अरेरावीसह शिवीगाळ केली. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही क्लिप ‘लोकमत’कडे आहे.
२ - बीड तालुक्यातील लिंबागणेश आरोग्य केंद्रातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला गावातीलच एका व्यक्तीने लसीबद्दल तक्रार केली. यावर आपण आदेश दिल्याचा खुलासा केल्यानंतरही गावातील पुढाऱ्याने चक्क तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांचे नाव घेत अरेरावी केली. तसेच सध्याचे प्रभारी डीएचओ डॉ. रौफ शेख यांच्याबद्दल अरेरावी करत फोन कट केला. हा प्रकार तीन आठवड्यांपूर्वी घडला होता. याचीही ऑडिओ क्लिप ‘लोकमत’कडे आहे.
--
जशी लस येईल, तसा पुरवठा केला जात आहे. ग्राउंड लेव्हलवर काम करताना अनंत अडचणी आहेत. आम्ही काम करूनही शिवीगाळ आणि अरेरावी होत असेल तर योग्य नाही. आम्हाला मदत करण्याऐवजी कामात अडथळा आणला जात आहे. रोजच असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे तक्रार तरी किती जणांविरोधात देणार? नागरिकांनीच परस्थिती समजून घेत सहकार्य करावे.
डॉ. नितीन मोरे, वैद्यकीय अधिकारी, टाकळसिंग