शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे विमा कंपनीने टेकले गुडघे; फरकाची रक्कम खात्यावर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:17 PM2018-10-09T17:17:41+5:302018-10-09T17:18:32+5:30
आणेवारीचे कारण पुढे करत विमा कंपनीने 429 रुपये प्रमाणे कमी देऊन चांगलेच उखळ पांढरे केले होते.
माजलगाव (बीड ) : तालुक्यातील चार सर्कल मध्ये 12 हजार हेक्टरचा सोयाबीन पिकाचा सन 2017-18 चा विमा शेतकऱ्यांना जून महिन्यात देण्यात आला होता.मात्र यात आणेवारीचे कारण पुढे करत विमा कंपनीने 429 रुपये प्रमाणे कमी देऊन चांगलेच उखळ पांढरे केले होते. या विरोधात 27 ऑगस्ट रोजी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून फरकाची रक्कम जमा होत आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांपुढे गुडघे टेकल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
सन 2017-18 मध्ये शेतकऱ्यांनी युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडे सोयाबीन या पिकाचा विमा काढला होता. उत्पन्नात घट झाल्यामुळे संबंधित विमा कंपनीने माजलगाव तालुक्यातील माजलगाव, गंगामसला, आडगाव व तालखेड या सर्कल मधील 12 हजार हेक्टर क्षेत्राचा विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर 7 हजार 563 रुपये वर्ग करणे आवश्यक असताना 7 हजार 134 रुपयांप्रमाणे विम्याची रक्कम वर्ग केली. यात हेक्टरी 429 रुपये या प्रमाणे कमी रक्कम शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कमी देऊन शेतकऱ्यांना 51 लाख रुपयांना गंडविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान शिवाजीराव शेजुळ, रमेश बाहेती, संजय शेजुळ, अरुण शेजुळ या चार शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी विमा कंपनी व शासनाकडे रीतसर तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने लोकमतने दिनांक 27 ऑगस्ट रोजी " शेतकऱ्यांच्या रेट्यानंतर विमा कंपनी नरमली " या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते या वृत्ताची दखल घेऊन विमा कंपनीने दिनांक 7 ऑक्टोबर पासून या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर फरकाची रक्कम वर्ग करणे सुरू केली असून तशा आशयाचे एस.एम.एस. शेतकऱ्यांना प्राप्त होऊ लागले असून ही रक्कम तब्बल 51 लाख इतकी असल्यामुळे शेतकाऱ्यांमधून आनंद पहावयास मिळत आहे.
विमा कंपनीकडून गंडविण्याचा प्रयत्न
विमा कंपनीकडून आणेवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांना गंडविण्याचा प्रकार सगळीकडेच सुरू असून केवळ माजलगाव तालुक्यातील चार सर्कल मध्ये जर 51 लाख रुपयांचा घोळ निघत असेल तर संपूर्ण मराठवाड्याचा विचार करता ही रक्कम कितीतरी कोटींच्या घरात जाते. मराठवाड्यात सगळ्यात जास्त नुकसान हे लातूर जिल्ह्याचे झाले असल्याचे शेतकरी शिवाजीराव शेजुळ यांनी सांगितले.