पोलीस कर्मचाऱ्यांतील अंतर्गत वाद सोशल मिडीयामुळे झाला ‘सेन्सेटीव्ह’; बीड पोलिसांना करावा लागला खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 04:20 PM2019-04-25T16:20:24+5:302019-04-25T16:20:55+5:30
बीड पोलिसांनी याची दखल घेत अवघ्या दोन तासात खुलासा केला
बीड : ड्यूटी करण्यावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये तु-तु, मैं-मंै, झाली. तसेच एका महिला कर्मचाऱ्याने पोलीस चौकीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली. त्यामुळे प्रकरण सार्वजनिक झाले आणि सर्वांचीच धावपळ उडाली. बीड पोलिसांनी याची दखल घेत अवघ्या दोन तासात खुलासा केला, आणि अफवा थांबविण्याचे आवाहन केले. ‘पोस्ट’ व्हायरल करणारे मात्र, पोलिसांच्या रडावर आहेत.
लोकसभा निवडणुक काळात जिल्हाधिकारी कार्यालयात गैरप्रकार घडला होता. तेव्हापासून कार्यालयात सर्वत्र बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. गुरूवारी सकाळी मुख्य प्रवेशद्वारावरही बंदोबस्त होता. येथील महिला कर्मचारी प्रवेशद्वारावर न बसता, पोलीस चौकीत जावून बसल्या. यावेळी वरिष्ठ असणाऱ्या हवालदाराने त्यांना गेटवर बसण्याची विनती केली. यातूनच त्यांच्यात तु-तु, मैं-मंै झाली. त्यांनी रागाच्या भरात दरवाजा बंद करून घेतला. सोबतच्या कर्मचाऱ्यांनी हा दरवाजा उघडला आणि त्यांची समजूत काढली. पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यास पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
दरम्यान, दरवाजा बंद करून महिला कर्मचाऱ्याने ओढणीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या अफवा सोशलमिडीयावर व्हायरल झाल्या. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी उपअधीक्षक भास्कर सावंत, पोनि पुर्भे यांच्याकडून माहिती घेत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र हा प्रकार असा काहीही नसून किरकोळ बाचाबाची झाली, असून याची चौकशी लावल्याचे उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी सांगितले.
बदनामी करणाऱ्या विरोधात तक्रार
हे प्रकरण सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे सदरील महिला कर्मचाऱ्याची बदनामी झाली. पसरलेल्या अफवांमुळे त्यांना मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बदनामी करणाऱ्यांविरोधात त्या तक्रार देण्याच्या तयारीत असल्याचेही विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
सर्व अफवा आहेत
ड्यूटीवरून किरकोळ बोलाबोली झाली. आत्महत्याचा प्रयत्न वगैरे या अफवा आहेत. बोलाबोली का झाली, याची चौकशी करण्यात येत आहे. खोट्या अफवांमुळे पोलिसांची प्रतीमा मलीन होत आहे.
- भास्कर सावंत, पोलीस उपअधीक्षक, बीड