International Women's Day : महिलांचा अनोखा सन्मान, दोनशे घरांवर महिला कुटुंबप्रमुखांच्या पाट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 05:14 PM2020-03-08T17:14:16+5:302020-03-08T20:21:20+5:30
International Women's Day : शेलापूरी ग्रामपंचायत नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते.
माजलगाव : महिला दिनाचे औचित्य साधुन शेलापूरी ग्रामपंचायतीने महिलांचा आगळा-वेगळा सन्मान करत संपूर्ण गावातील 200 घरांवर महिला कुटुंबप्रमुखांच्या नावाने पाट्या लावल्या आहेत. त्याचबरोबर बचत गटांच्या महिलांसाठी सुद्धा व्यवसाय मार्गदर्शन शिबीर यावेळी घेण्यात आले.
शेलापूरी ग्रामपंचायत नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, शंभर टक्के शौचाल, डिजीटल शाळा, डिजीटल आंगणवाडी, स्मार्ट ग्राममध्ये गावाची निवड सुद्धा झालेली आहे. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करत आहेत. त्यामुळे महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने शेलापूरी ग्रामपंचायतीने 26 जानेवारीला हा आगळा - वेगळा ठराव घेतला होता. त्याची अंमलबजाणी आज जागतिक महिला दिनी सकाळी 10 वाजता करण्यात आली.
सकाळपासूनच महिलांनी घरासमोर रांगोळ्या, रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढल्या होत्या. हालगी, फटाकांची आतषबाजी करत संपूर्ण गावातील 200 घरांवर महिला कुटुंबप्रमुख म्हणुन पाट्या लावण्यात आल्या. हालगी व फटाक्यांच्या होत असलेल्या आतषबाजीमुळे शेलापूरी गावात एखाद्या सणाप्रमाणे उत्साहपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी माजी सभापती नितीन नाईकनवरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच उमा दिलीप झगडे, उपसरपंच गणेशराव शेंडगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला बचत गटातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या ज्योती चैधरी, रमेश कुटे, ग्रामसेवक राजकुमार झगडे, सिध्दार्थ घडसे, गोविंद शेंडगे यांचेसह गावातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.