अनियमितता भोवली; तीन कर्मचाऱ्यांची सेवासमाप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:00+5:302021-07-10T04:24:00+5:30
बीड : रोहयोच्या कामकाजात हलगर्जीपणासह अनियमिततेचा ठपका ठेवत शिरूर कासार, गेवराई येथील पंचायत समिती कार्यालयातील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची ...
बीड : रोहयोच्या कामकाजात हलगर्जीपणासह अनियमिततेचा ठपका ठेवत शिरूर कासार, गेवराई येथील पंचायत समिती कार्यालयातील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायमची समाप्त करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी केली. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईत शिरूर कासार पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी क्लार्क व डाटा एन्ट्री ऑपरेटर सय्यद आमीर यांच्यासह गेवराई पंचायत समितीमधील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रशांत शरद कोटुळे व महादेव संभाजी येवले या तिघांचा समावेश आहे. यातील सय्यद आमीर यांनी शिरूर कासार तालुक्यातील रोहयोच्या कामांची देयके एकाच खात्यावरून अनेकांना प्रदान केली होती. तसा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी ६ जुलै रोजी सादर केल्यावरून अनियमिततेचा ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी सय्यद यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले.
तसेच, प्रशांत कोटुळे, महादेव येवले यांनी गेवराई तालुक्यातील रोहयोच्या कामांवरील मस्टर निर्गमित न करणे, वेळेवर ऑनलाईन न करणे, वेळेवर मजुरी प्रदान न करणे अशा प्रकारे दैनंदिन कामकाजात हलगर्जीपणा केला होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी कामकाज सुधारण्याच्या वारंवार सूचना देऊनही हलगर्जीपणा कायम होता. तसेच, या दोघांच्याही कामाचा प्रगती अहवाल असमाधानकारक असल्याने ते कामकाज करण्यास सक्षम नसल्याचे गृहीत धरून दोघांविरोधात कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणाचा ठपका ठेवत थेट सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.
यांना मिळणार नाही पुन्हा काम
या कारवाई झालेल्या तिघांनाही जिल्हा परिषदेअंतर्गत व इतर कोणत्याही विभागाच्या कंत्राटी तत्त्वावरील पदावर घेण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. या गंभीर कारवाईमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.