आरणवाडी तलाव कामाची पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:16+5:302021-04-28T04:36:16+5:30
आरणवाडी येथील साठवण तलावाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून धार कोंडण्याचे काम सुरू आहे. ही धार कोंडताना काळ्या मातीचा ...
आरणवाडी येथील साठवण तलावाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून धार कोंडण्याचे काम सुरू आहे. ही धार कोंडताना काळ्या मातीचा वापर योग्य केला जात होता. मात्र, काळ्या मातीचे दोन्ही बाजूंना बारीक मुरूम वापरून त्याची दबाई करण्याऐवजी मोठे दगड टाकून काम आटोपण्याचा प्रयत्न सुरू होता. रविवारी आरणवाडी येथील जागृत ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते, तर सोमवारपासून मोठे दगड काढण्याच्या सूचना दिल्यानंतर कंत्राटदाराने काम सुरू केले. दरम्यान, मंगळवारी सकाळी लघु पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता चिस्ती, कार्यकारी अभियंता यू. व्ही. वानखेडे, उपअभियंता व्ही. बी. हत्ते यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या तक्रारीची शहानिशा केली असता दगड भरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कंत्राटदार व संबंधित कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्यांना हे सर्व दगड काढून मुरमाचा वापर करण्याबाबत तसेच दबाई करून काम चांगल्या दर्जाचे करण्याच्या सूचना दिल्या. या अधिकाऱ्यांनी सर्व कामाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत काम चांगल्या दर्जाचे करून घेतले जाईल, असे सांगितले.
===Photopath===
270421\img-20210427-wa0134_14.jpg