अनोळखी किरायदार ठेवणे महागात पडले; तरुणाने घर मालकाच्या अल्पवयीन मुलीस पळवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 07:32 PM2024-12-03T19:32:22+5:302024-12-03T19:32:45+5:30
धारूरमधील प्रकार : पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बीड : अल्पवयीन मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढच होत चालली आहे. घरी किरायाने राहणाऱ्या मुलाने मालकाच्याच १४ वर्षांच्या मुलीला पळून नेले. हा प्रकार धारूर शहरात ३० नोव्हेंबर रोजी सकाळी घडला. याप्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
धारूर शहरातील एका भागात ३६ वर्षिय व्यक्तीला दोन मुले आणि दोन मुली आहेत. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी लहान मुलगी शाळेत जाते म्हणून नेहमीप्रमाणे गेली. त्यानंतर लगेच तिचे वडील मुलाला सोडण्यासाठी शाळेत गेले. यावेळी त्यांनी मुलगी काय करते, हे पाहण्यासाठी शाळेत गेले. तिच्या वर्गात जाऊन विचारल्यावर ती शाळेतच आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर शाळेतील इतर मित्र, मैत्रिणींनाही विचारले तर तिला कोणी पाहिले नसल्याचे सांगितले. मुलीच्या वडिलांनी नातेवाईकांकडेही विचारणा केली, परंतु ती कोणाकडेही नव्हती. त्यानंतर त्यांनी घरी आल्यावर आपल्याच घरी किरायाची खोली करून राहणाऱ्या मुलाचा शोध घेतला, तर तो देखील सकाळपासून गायब होता. काही लोकांनी त्याला सामान घेऊन जाताना पाहिले होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांचा संशय वाढला. त्यांनी तातडीने धारूर पोलिस ठाणे गाठत विशाल जाधव नामक मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनोळखीला खोली देणे महागात
ज्या घरात विशाल जाधव राहत होता, त्याच्या मालकाला केवळ नाव माहिती होते. तो कोणत्या गावचा आहे, काय करतो, याची कसलीही माहिती नव्हती. याच संधीचा फायदा घेत विशालने मालकाच्याच मुलीला घेऊन धूम ठोकली. आता पोलिसांसह नातेवाइकांकडून या दोघांचाही शोध सुरू आहे. मुलीचे वय हे १४ वर्षे ६ महिने एवढे असल्याचे फिर्यादीत नोंद आहे.