‘काही जण भाजपत गेल्याने फरक पडत नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:21 AM2019-10-17T00:21:30+5:302019-10-17T00:23:02+5:30
काही मूठभर पदाधिकारी भाजपमध्ये गेले याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होत नसतो सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी सोबतच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केले.
माजलगाव : काही मूठभर पदाधिकारी भाजपमध्ये गेले याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होत नसतो सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी सोबतच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केले.
माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथे प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, रमेश सोळंके, विश्वंभर थावरे, छगन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. गावकऱ्यांना अभिवादन करत प्रकाश सोळंके यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
प्रकाश सोळंके म्हणाले, आपल्या ३२ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत छत्रबोरगावला किमान शंभर वेळा तरी भेट दिलेली आहे. मात्र या निवडणुकीत छत्रबोरगावकरांनी केलेले अभूतपूर्व स्वागत मी कदापिही विसरू शकणार नाही माझ्यावर जे अफाट प्रेम ग्रामस्थांनी दाखवले. त्या ॠणात कायम राहणे पसंत करेल. माझे मूळ गाव मोहखेड पेक्षाही छत्रबोरगावमधून मताधिक्य मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत सोळंके म्हणाले, माझ्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ग्रामीण भागाचा फार मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील सामान्य माणूसच माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्यामुळे छत्रबोरगाव परिसरावर माझे विशेष प्रेम आहे. ग्रामस्थांनीही मला भरभरून दिलेले आहे. ग्रामस्थांच्या ॠणात सदैव राहण्याची आपली तयारी असून आमदार झाल्यानंतर छत्रबोरगावकरांच्या हाकेला ओ देऊन त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.