लांडग्यानेच पाडला 'त्या' शेळ्यांचा फडशा; पशुवैद्यकीय अहवालातून कारण स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 05:37 PM2022-10-20T17:37:32+5:302022-10-20T17:37:45+5:30
पशुवैद्यकीय विभागाने शवविच्छेदन केल्यानंतर हा हल्ला लांडग्यानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
नितीन कांबळे
कडा (बीड) : शेतात चरत असलेल्या शेळ्यांवर अचानक अज्ञात वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याने १३ शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली असल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पशुवैद्यकीय विभागाने शवविच्छेदन केल्यानंतर हा हल्ला लांडग्यानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आष्टी तालुक्यातील हाजीपुर येथील अरूणा बापु सापते ही महिला मंगळवारी शेळ्या घेऊन स्वतःच्या शेतात चारण्यासाठी गेली होती. सायंकाळी घरी परतण्याच्या वेळेलाच अज्ञात वन्यप्राण्यांनी हल्ला चढवत १३ शेळ्यांचा फडशा पाडला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला याचे कारण समोर आले नव्हते. बुधवारी आष्टी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी इतर कोणत्या प्राण्याने नव्हे तर हा हल्ला लांडग्यानेच केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती भाळणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.सुनिल गदादे यांनी सांगितले.