बांधावरचा वाद अन थेट १०० मंदिरांना आरडीएक्सने उडविण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 01:24 PM2021-12-01T13:24:28+5:302021-12-01T13:25:50+5:30
मी नामी गुंड व ड्रग्स माफिया आहे. मला ५० लाख रुपये खंडणी द्या अन्यथा मंदिर आरडीएक्सने उडवेन, असा मजकूर असलेले हस्तलिखित पत्र वैद्यनाथ संस्थानला २६ नोव्हेंबर रोजी मिळाले होते.
संजय खाकरे / अविनाश मुडेगावकर
परळी / अंबाजोगाई : येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रभू वैद्यनाथ व अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिरांकडे पत्राद्वारे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. शिवाय पैसे न दिल्यास मंदिरे आरडीएक्सने उडविण्याची टोकाची धमकीही दिली होती. दरम्यान, या पत्रात नमूद तिघांच्या नावे गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास गतिमान केला. मात्र, हे पत्र या तिघांनी नव्हे तर त्यांना गोवण्यासाठी त्यांच्या नावाने एका शिक्षकाने पाठविल्याचा दावा त्यांनी पोलिसांकडे केला. जमिनीच्या वादातून यापूर्वीही शिक्षकाने सुडापोटी त्यांच्या नावे शंभर मंदिरांना धमक्यांचे पत्र पाठवल्याची माहिती पुढे (threatens to blow up 100 temples by RDX ) आली. त्यामुळे या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे.
मी नामी गुंड व ड्रग्स माफिया आहे. मला ५० लाख रुपये खंडणी द्या अन्यथा मंदिर आरडीएक्सने उडवेन, असा मजकूर असलेले हस्तलिखित पत्र वैद्यनाथ संस्थानला २६ नोव्हेंबर रोजी मिळाले होते. रतनसिंग रामसिंग दख्खने (रा. काळेश्वर नगर, विष्णुपुरी, नांदेड) या पत्त्यावरुन आलेल्या पत्रावर व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) यांच्या नावे आले होते. मंदिर संस्थानचे सचिव राजेश देशमुख यांच्या तक्रारीवरुन या दोघांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. अशाच आशयाचे दुसरे पत्र प्रभाकर नामदेव पुंड (रा. पिंपळगाव, जि. नांदेड) या नावे संस्थानला २६ रोजी प्राप्त झाले. त्यावरुन २७ रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी तपास गतिमान करुन तिन्ही संशयितांना २८ रोजी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता हे पत्र आपण पाठविलेच नाही, असा खुलासा त्यांनी केला. या दोन्ही पत्रातील हस्ताक्षर हे सारखेच असून, जमिनीच्या वादातून सूड उगविण्यासाठी नंदकुमार डिगांबर बालुरे (रा. सिडको परिसर, नांदेड) या शिक्षकाने पाठविले असावे, असा संशय या तिघांनी व्यक्त केला. रतनसिंग दख्खने, व्यंकट मठपती व प्रभाकर पुंड यांचे जबाब नोंदवून पोलिसांनी त्यांना सोडले, तर शिक्षक नंदकुमार बालुरे याचा शोध सुरु आहे.
...असा सुरु झाला सुडाचा प्रवास
शिक्षक बालुरे याने रतनसिंग रामसिंग दख्खने यांना विक्री केली. मात्र, या शेती व पैशांच्या वादातून त्यांच्यात बिनसले. त्यानंतर सुडाचा प्रवास सुरु झाला. या वादातून रतनसिंग यांना त्रास देण्यास बालुरे याने सुरुवात केली. विविध पोलीस ठाणे, मंदिरे व खासगी लोकांना शेकडो बनावट पत्र पाठवली. जमिनीचा वाद न्यायालयात सुरु असून, या तारखेला रतनसिंग हे गैरहजर राहावेत म्हणून बालुरे याने वैद्यनाथ व योगेश्वरी देवी मंदिराला त्याच्यासह इतरांच्या नावे बनावट पत्र पाठविली, असा दावा रतनसिंग यांनी पोलिसांकडे केला आहे.