व्हायरल झालाय चांगला... आमच्या पप्पांनी गंपती आणला म्हणणारा साईराज

By सोमनाथ खताळ | Published: September 10, 2023 08:50 AM2023-09-10T08:50:34+5:302023-09-10T08:51:16+5:30

सोशल मीडियाने अनेकांना हीरो केले, त्यात बीड जिल्ह्यातील परळीचा चार वर्षांचा साईराज हादेखील एक आहे. 

It's good that it has gone viral... Sairaj who says that our father brought Gambati | व्हायरल झालाय चांगला... आमच्या पप्पांनी गंपती आणला म्हणणारा साईराज

व्हायरल झालाय चांगला... आमच्या पप्पांनी गंपती आणला म्हणणारा साईराज

googlenewsNext

सोमनाथ खताळ

सध्या साेशल मीडियावर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला...’ हे गाणे प्रचंड व्हायरल होत आहे. हे गाणे गाणारी चिमुकली भावंडे ठाणे जिल्ह्यातील असली तरी त्यावर अभिनय करून याला चर्चेत आणणारा चिमुकला बीड जिल्ह्यातील आहे. सध्या त्याने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियाने अनेकांना हीरो केले, त्यात बीड जिल्ह्यातील परळीचा चार वर्षांचा साईराज हादेखील एक आहे. 

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे मनोज घोरपडे (मु. चरली वडा, पो. राहनाळ, ता. भिवंडी, जि. ठाणे) यांनी लिहिले. भिवंडीत वडापावचा गाडा लावून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. २०२२ मध्ये त्यांनी गाडा चालवत असतानाच ‘ गरबा नाचायला आली मम्मीच्या संगे ’ हे गाणे लिहिले. ते गाण्यासाठी मोठ्या सेलिब्रिटींऐवजी आपलीच चार वर्षांची शौर्या आणि ७ वर्षांच्या माउलीला पुढे केले. त्यांना गायनाची एक तालीम करून दाखवली आणि या चिमुकल्या भावंडांनी ते गाऊन वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानंतर २०२२ सालीच गणेशोत्सवाच्या वेळी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला..’ हे गाणे लिहिले. शौर्या आणि माउली घोरपडे यांनी ते गायले. परंतु, वर्षभर त्याची फारशी प्रसिद्धी झाली नाही. आता अचानक हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रुळले आहे. चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच या गाण्याने वेड लावले आहे. त्याला कारण ठरलाय केंद्रेवाडी (ता. परळी, जि. बीड) येथील साईराज केंद्रे हा अवघ्या चार वर्षांचा चिमुकला. शाळेच्या गणवेशात त्याने या गाण्यावर केलेला अभिनय सध्या प्रत्येकाच्या मनात बसला आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप या सर्व ठिकाणी त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. राज्यभरात साईराजच्या अभिनयाने लोकांना भुरळ घातली आहे. तो सध्या सर्वत्र फेमस झाला आहे. 

‘टिकटॉक’वर पहिले गाणे
साईराजने अवघा दीड वर्षाचा असताना ‘ए आई, मला पावसात जाऊ दे’ या गाण्यावर ‘टिकटॉक’वर पहिला व्हिडीओ बनवला. त्यानंतर आता शाळेत जाताना यूट्यूबवर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे पाहिले. त्यावर व्हिडीओ बनवण्याचा हट्ट त्याने वडील गणेश केंद्रे यांच्याकडे धरला. एके दिवशी शाळेत जातानाच गणेश केंद्रे यांनी त्याचा हा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला अन् बघता बघता त्याने राज्यभरात धुमाकूळ घातला. तो अभिनयासोबतच अभ्यासातही प्रचंड हुशार असल्याचे वडील गणेश केंद्रे सांगतात. ज्यांनी गाणे गायले त्यांचा आणखी संपर्क झाला नाही. परंतु, माझ्या मुलाला मिळत असलेली प्रसिद्धी पाहून मनस्वी आनंद होत आहे, असेही गणेश केंद्रे सांगतात. 

गणपती येणार आमच्या घराला...

शौर्या व माउली या चिमुकल्यांनी आपल्या गोड आवाजाने लोकांची मने जिंकली आहेत. साईराज जरी फेमस झाला असला तरी पडद्यामागे असलेल्या चिमुकल्या भावंडांनाही त्याचे काही श्रेय जाते. या भावंडांची पहिली दोन गाणी हिट झाल्यानंतर आता ‘गणपती येणार आमच्या घराला, १० दिवसांची मजा...’ हे गाणे त्यांनी गायले आहे. तेदेखील लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच रिलीज करणार असल्याचे मनोज घोरपडे यांनी सांगितले. मुलांना गायनाची खूप आवड आहे. परंतु, परिस्थिती आडवी येते. अशातही मी आणि माझी मुले आमचा छंद जोपासतो. आमच्या मुलांच्या गाण्यावर दुसरे कोणी फेमस होत असेल, तर याला मी काय करणार ? कोणाला फेमस करायचे हे सोशल मीडिया आणि नागरिकांच्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया मनोज घोरपडे यांनी दिली.

लेखक उपसंपादक, बीड 
 

 

 

Web Title: It's good that it has gone viral... Sairaj who says that our father brought Gambati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.