आता बस्स झालं.... खूप त्रास होतोय, मी नोकरी सोडतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:35 AM2021-09-19T04:35:17+5:302021-09-19T04:35:17+5:30
बीड : खूप दिवसांपासून मी एकटीच काम करतेय. तरीही कोणीही येतेय आणि मलाच बोलतेय. त्यामुळे आता बस्स झालं. मला ...
बीड : खूप दिवसांपासून मी एकटीच काम करतेय. तरीही कोणीही येतेय आणि मलाच बोलतेय. त्यामुळे आता बस्स झालं. मला खूप त्रास होतोय, म्हणून मी नोकरी सोडतेय, असा हस्तलिखित अर्ज महिला डॉक्टरने मॅग्मो संघटनेच्या सोशल मीडियावरील ग्रुपवर टाकला आहे. गेवराई तालुक्यातील जातेगाव ग्रामस्थांबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. या प्रकाराने डॉक्टरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जातेगाव आरोग्य केंद्रात डॉ. प्रकाश फड व डॉ. पल्लवी झोपडे हे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. ८ मार्चपासून डॉ. फड हे आजारी रजेवर आहेत. त्यामुळे डॉ. झोडपे या एकट्याच कार्यरत आहेत. नुकतीच डॉ. फड यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी दोन दिवसांपूर्वी डॉ. जाधव आले. परंतु, त्या अगोदर डॉ. झोडपे यांनी यंत्रणा सांभाळली. कोरोना लसीकरण, ओपीडी आदी प्रतिबंधात्मक कारवाया कराव्या लागल्या. अशातही गावातील काही राजकीय लोकांनी आरोग्य केंद्रात येऊन वाद घालणे सुरू केले. महिला वैद्यकीय अधिकारी असतानाही त्यांना सहकार्य करण्याऐवजी तक्रारी केल्या. शनिवारी तर चक्क एका शिक्षकाने ‘तुम्हीच इंजेक्शन द्या’ असा हट्ट धरला. याच मुद्द्यावरून बाचाबाची झाली आणि डॉ. झोडपे व शिक्षक आणि त्यांच्या भावात वाद झाले. यावर संतापलेल्या डॉ. झोडपे यांनी अर्ज लिहीत सोशल मीडियावर अर्ज टाकत मी नोकरी सोडतेय, असे कळविले. या प्रकाराने मात्र, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
---
मी दोन वर्षांपासून जातेगाव आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मला लहान बाळ आहे. ते बाळ तुम्ही सोबतच का आणता, या मुद्द्यावरून अनेकदा वाद घातले. तसेच शनिवारीही एका शिक्षकाने तुम्हीच इंजेक्शन द्या, असा हट्ट धरला. परिस्थितीवरून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी भावाला बोलावून घेत आणखी वाद घातले. येथील ग्रामस्थांकडून सारखाच त्रास होत असल्याने मी नोकरी सोडत आहे. मी वरिष्ठांकडे आणखी राजीनामा दिला नाही, पण संघटनेच्या ग्रुपवर अर्ज टाकला आहे.
डॉ. पल्लवी झोडपे, वैद्यकीय अधिकारी जातेगाव, ता. गेवराई