गळ्यातली चेन मोडायची वेळ आली, हे कसले ब्रेक द चेन ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:33 AM2021-04-10T04:33:07+5:302021-04-10T04:33:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाची चेन तोडण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ हे अभियान राबविले जात आहे. परंतु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाची चेन तोडण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ हे अभियान राबविले जात आहे. परंतु इकडे दुकाने, व्यवसाय बंद असल्याने गृहिणींवर चेन मोडायची वेळ आली आहे. दुकानांसाठी घेतलेले बँकेचे कर्ज फेडायचे कसे? भाडे द्यायचे कोठून, घर चालवायचे कसे? असे अनेक प्रश्न व्यापाऱ्यांच्या सौभाग्यवतींना पडला आहे. निर्बंध कडक करा, पण दुकाने उघडण्यास परवानगी द्या, असा सूरही गृहिणींशी संवाद साधल्यानंतर उमटला.
२०२० मध्ये राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन लावले. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला. वर्ष अखेरीच्या काही महिन्यांत दुकाने उघडले आणि काही प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसादही मिळू लागला होता. तेवढ्यात आता आणखी कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा ब्रेक द चेन हे अभियान राज्यभर लागू केले. जिल्ह्यात केवळ दुकाने बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प झाली असून दुकानदार, व्यापारीच नव्हे तर त्यांच्या पत्नीही तणावात आहेत.
चार महिनेच सुरू राहिला व्यवसाय, कर्ज कसे फेडायचे?
२०२० मध्ये साधारण नोव्हेंबर व डिसेंबर आणि २०२१ मध्ये जानेवारी व फेब्रुवारी असे चारच महिने दुकाने आणि इतर व्यवसाय सुरू राहिले. परंतु ग्राहकांचा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक उलाढालही झाली नाही. अनेकांना तर दुकान भाडेही देणे मुश्किल झाले होते. अशात कर्जे फेडायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला होता.
निर्बंध कडक करा, पण लॉकडाऊन उघडा
दिवाळीलाच दुकान उघडले होते. मोठ्या थाटात पुजा केली. दुकानाची जागा घेण्यासाठी आर्थिक गुंतवणूकही केली. थोडा प्रतिसाद मिळत असतानाच पुन्हा दुकाने बंद करण्याचा आदेश आला. त्यामुळे दुकानाच्या जागेच प्रत्येक महिन्याचे भाडे द्यायचे कसे? असा प्रश्न आहे. इथे दुकानाचाच खर्च निघत नसल्याने इतर काहीच अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत.
प्रीती सौरभ चिंतामणी, बीड
गतवर्षीच लॉकडाऊनमुळे खूप त्रास झाला आहे. दुकानाला ४२ हजार रूपये भाडे आहे. बंद असो वा चालू, हे भाडे भरावेच लागते. तसेच बँकेचेही हप्ते आहेत. दुकान बंद असल्यावर आणि व्यवसाय नसल्याने कोठून पैसे भरायचे? त्यामुळे तणाव वाढत आहे.
संगिता संतोष बादाडे, बीड
व्यवसाय ठप्प असल्याने घरात पैसा येत नाही. भाडे, हप्ते, कर्ज आदीसाठी पैसे भरायचे कोठून? कामगारांना नाईलाजाने कमी करावे लागत आहे. आम्ही तरी पोटाला पोटभर खातो, पण त्यांच्या पोटाचे काय? असा प्रश्न आहे. निर्बंध घालून लॉकडाऊन उघडावे.
संगिता ऋषिकेश ढास, बीड