राजकीय भाऊबंदकीवर आयजींची चौफेर टोलेबाजी !
By Admin | Published: March 17, 2017 12:17 AM2017-03-17T00:17:30+5:302017-03-17T00:20:38+5:30
बीड : पोलीस जनतेचाच एक भाग आहे. जनतेचे प्रतिबिंब पोलिसांमध्ये उमटत असते.
बीड : पोलीस जनतेचाच एक भाग आहे. जनतेचे प्रतिबिंब पोलिसांमध्ये उमटत असते. पोलीस व जनतेत सुसंवादाचा अभाव आहे, अशी खंत व्यक्त करुन कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा दुरावा कमी झाला पाहिजे असे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी केले.अजित पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय भाऊबंदकी व पोलिसांवर येणाऱ्या ताणाची जाहीर कबुली देत चौफेर टोलेबाजी केली. बीडची प्रतिमा गुन्हेगारीमुळे मलिन झाली होती. मात्र, आता मुंबईनंतर बीड पोलिसांचे नाव निघत असल्याचे डॉ. योगेश क्षीसागर भाषणात म्हणाले होते. त्याचा धागा पकडून पाटील म्हणाले, या मताशी मी सहमत आहे. कारण मुंबईनंतर परळीत काका- पुतण्यात दरी निर्माण झाली. गेवराई व बीडही त्याला अपवाद राहिले नाही. नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका शांततेत पार पडतील की नाही? याची मला अधिक काळजी होती, अशी जाहीर कबुली देतानाच पाटील यांनी अधीक्षक श्रीधर यांनी सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याबद्दल त्यांचे कौतूक केले.
पदाधिकाऱ्यांनी ठरवले तर बीडमध्ये प्रत्येक कार्यक्रम डीजेशिवाय होऊ शकतो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के वाटा आहे. मात्र, स्वतंत्रपणे काम करु दिले जात नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. महिलांना अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यांचा कारभार त्यांना देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
जुन्या अधीक्षक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाणीचे ढिगारे असतात. त्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच पाटील यांनी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांची पाटी कोरी आहे. त्यांनी स्वच्छतेचा ध्यास घेऊन शहर चांगले करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पालिकेच्या स्वच्छतेविषयक कार्यक्रमास मी आवर्जून उपस्थित राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आयजी म्हणून हे सर्व सांगण्याचा मला अधिकार असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. हशा अन् टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रम आटोपला.