जगद्गुरू शंकराचार्यांच्या स्वागताची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:04 AM2019-01-30T01:04:09+5:302019-01-30T01:04:17+5:30
दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) येथील जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी भारत विजयी यात्रेनिमित्त २, ३ व ४ फेब्रुवारीदरम्यान बीड शहरात वास्तव्यास असणार असून या तीन दिवसात शोभायात्रेसह विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) येथील जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी भारत विजयी यात्रेनिमित्त २, ३ व ४ फेब्रुवारीदरम्यान बीड शहरात वास्तव्यास असणार असून या तीन दिवसात शोभायात्रेसह विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे.
सर्व धर्म समभावाचा संदेश घेऊन स्वामीजी भारत विजयी यात्रेवर निघाले आहेत. २ फेब्रुवारी रोजी शोभायात्रा काढून जगद्गुरूंचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अॅड. कालीदास थिगळे, वे.शा.सं.धुंडीराज शास्त्री पाटांगणकर, ह.भ.प.भरतबुवा रामदासी, ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांनी दिली.
श्री क्षेत्र जनीजनार्दन संस्थान येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जगद्गुरू शंकराचार्य यांचे २ फेब्रुवारी रोजी आगमन होताच सायंकाळी ६ वाजता त्यांची शोभायात्रा बलभीम चौक ते सर्वेश्वर मंदिरापर्यंत निघणार आहे.
त्यानंतर आचार्यश्रींचे संक्षिप्त आशिर्वचन लाभणार आहे. रात्री ८.३० वाजता शहरातील औटी मंगल कार्यालय येथे श्रीचंद्रमौलीश्वर परमेश्वर पूजा होईल.
रविवार, दि.३ फेब्रुवारी रोजी जगद्गुरु शंकराचार्यांचे प्रत्यक्ष दर्शन, पाद्यपूजा होणार आहे. दुपारी ४ ते ६ या वेळेत अभंगवाणी कार्यक्रम विठ्ठलसाई प्रतिष्ठान येथे होणार असून, तेथेच सायंकाळी ६.३० वाजता गुरु वंदना कार्यक्रम व जगद्गुरूंचे आशीर्वचन होणार आहे.
सोमवार दि. ४ फेब्रुवारी रोजी आचार्यश्रींचे प्रत्यक्ष दर्शन व पाद्यपूजा सकाळी १० वाजता हाईल. त्यानंतर त्यांचे बीड येथून शुभप्रस्थान होईल. या सर्वक्रमाच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. आचार्यश्रींचे दर्शन व आशीर्वचन सर्व जाती, धर्म, पंथ यांच्यासाठी खुले असणार आहे. शोभायात्रेसह सर्व कार्यक्रमांमध्ये जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच आचार्यश्रींच्या भारत विजयी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्रुतीगंध वेद पाठशाळा आणि जगद्गुरू शंकराचार्य विजयी यात्रा स्वागत समितीने केले आहे. यावेळी दिलीप खिस्ती, प्रमोद पुसरेकर, विनायक पाटांगणकर, संजय गुळजकर आदींसह इतरांची उपस्थिती होती.
जगद्गुरू शंकराचार्यांच्या स्वागतासाठी काढण्यात येणारी शोभायात्रा मुख्य आकर्षण ठरणार आहे. शहरातील ब्रह्मयोगिनी, ब्रह्मतेज, आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने या शोभायात्रेमध्ये विविध वेशभूषा, विष्णू दशावतार साकारले जाणार आहेत. शोभायात्रेत महिलांसह पुरु ष, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.