बीडमध्ये आरक्षणासाठी जागर गोंधळ, ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:09 AM2018-08-04T00:09:59+5:302018-08-04T00:10:40+5:30
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी राज्य सरकारला इशारा देण्यात आला होता. शुक्रवारी परळी आंदोलन सुरुच होते. जिल्ह्यात अंबाजोगाई शहरात जागर गोंधळ करीत रॅली काढण्यात आली. केज, माजलगाव, गेवराई येथे आंदोलने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी राज्य सरकारला इशारा देण्यात आला होता. शुक्रवारी परळी आंदोलन सुरुच होते. जिल्ह्यात अंबाजोगाई शहरात जागर गोंधळ करीत रॅली काढण्यात आली. केज, माजलगाव, गेवराई येथे आंदोलने करण्यात आली.
अंबाजोगाईत जागर गोंधळ
एक मराठा, लाख मराठा या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने शुक्रवारी जागर गोंधळ आंदोलन करण्यात आले. नगर परिषद कॉम्पलेक्सपासून जागर गोंधळ रॅली काढण्यात आली. शहरातील पाटील चौक, योगेश्वरी देवी मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबून जागर गोंधळ करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेतील कलाकारांनी जागर गोंधळाद्वारे आरक्षणाची मागणी केली. यावेळी शाळकरी मुला- मुलींनी जोशपूर्ण भाषणे केली. प्रचंड घोषणाबाजी करीत आरक्षणाची मागणी झाली. उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन दिले.
चोख पोलीस बंदोबस्त
संभाव्य गर्दी लक्षात घेऊन शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. अपर पो. अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सोमनाथ गिते यांनी फौजफाट्यासह परिस्थितीवर लक्ष ठेवले. शहर वाहतूक शाखेनेही योग्य नियोजन केले.
मागण्या मान्य करा
मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, आरक्षण घोषित केल्याशिवाय मेगाभरती प्रक्रिया सुरु करू नये, मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, शहीद मराठा बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी शासकीय नोकरी द्यावी, जिल्हा स्तरावर मराठा वसतिगृहाची तत्काळ निर्मिती करावी, मराठा विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी तत्काळ एक हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
माजलगावात तिसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन
माजलगाव: मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी १ आॅगस्टपासून येथील तहसील कार्यालयासमोर तिसºया दिवशीही ठिय्या आंदोलन सुरु होते. तालुक्यातील विविध संघटनांचा पाठिंबा वाढत असल्याने आंदोलनाला मोठे स्वरूप आले आहे. आंदोलनाला येथील डॉक्टर असोसिएशन, मल्टिस्टेट पतसंस्था संघटना, आडत व्यापारी संघटना, हमाल, मापाडी, मुनीम संघटना, मोबाईल शॉपी असोसिएशन आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
भाटुंबा फाट्यावर रास्ता रोको
केज : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी केज अंबाजोगाई राष्टÑीय महामार्गावरील भाटुंबा फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी सकाळी दहा वाजता रास्ता रोको करण्यात आला. एक तासानंतर नायब तहसीलदार आशा वाघ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
गेवराईत ठिय्या आंदोलन सुरु
गेवराई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी साठी शुक्रवारी येथील शास्त्री चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरूवात करण्यात आली. यावेळी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं अशा विविध घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर मराठा आंदोलनात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झाले.