जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे ३ लाख मे. टन गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:14+5:302021-02-15T04:29:14+5:30
संस्थापक चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या गळीत हंगामात ...
संस्थापक चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या गळीत हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ७२७१ हेक्टर उसाची नोंद आहे. या गळीत हंगामासाठी तोडणी वाहतूक यंत्रणा ट्रक- ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर असे मिळून ३९१ व बैलगाडी १००, दोन हार्व्हेस्टर या वाहनांची यंत्रणा ऊस आणण्याचे
काम करीत आहे. १३ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या टप्प्यामधील तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण करून उर्वरित तीन लाख गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने कारखान्याची सर्व यंत्रणा काम करीत आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एल. क्षीरसागर, कारखान्याचे अधिकारी- पदाधिकारी, कर्मचारी ऊस तोडणी कामगार, ऊस बागायतदार, ऊस वाहतूक ठेकेदारांच्या प्रयत्नांबद्दल कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमरसिंह पंडित व संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले. तसेच कारखाना कार्य क्षेत्रातील नोंदीचे सर्व उसाचे गाळप पूर्ण होईपर्यंत कारखाना सुरू ठेवला जाईल, अशी स्पष्टोक्ती दिली.
उसाची नोंद सुरू
सध्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये साडेतीन लाख ऊस मेट्रिक टन उपलब्ध असून, उर्वरित संपूर्ण उसाचे गाळपाचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही, याची खबरदारी कारखाना व्यवस्थापन घेत आहे. सन २०२०-२१ गळीत हंगामासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ४३२३ हेक्टर क्षेत्रावर आडसाली, पूर्वहंगामी, सुरू ऊस लागवडीची नोंद ऑनलाइन केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार राहणार नाही.
ऊस क्षेत्राची जीपीएसद्वारे मोजणी
ऊस नोंदीचा आणि अचूक क्षेत्राचा अंदाज घेऊन गळीत हंगाम नियोजनास मदत होईल. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी ऊस क्षेत्राच्या चारही कोपऱ्यावर जाणे बंधनकारक असून, तेथून जीपीएस प्रणालीद्वारे शेतीचे क्षेत्रफळ मोजले जाणार आहे. तो डाटा शेतकऱ्यांच्या फोटोसह कारखान्यातील संगणक सर्व्हरवर अपलोड होणार आहे, असे कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी सांगितले.